पुणे : एका वृद्ध निराधार महिलेला आसरा उपलब्ध करून देणाऱ्या प्रणव गंजीवाले याचा कसबा मतदार संघाच्या वतीने पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रणव चे काम आदर्शवत असून तरुणांनी त्याचा कामाचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी यावेळी केले.
यावेळी नगरसेवक राजेश येनपुरे, हेमंत रासने, दिपक पोटे, अजय खेडेकर, सम्राट थोरात,अशोक येनपुरे, सुलोचना कोंढरे,आरती कोंढरे, रवी अनासपुरे,वैशाली नाईक, छगन बुलाखे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
पर्वती पायथ्याला राहणारी एक वृद्ध व निराधार महिला बाजीराव रोडला भटकत होती. तिच्या अंगावरील कपडे जीर्ण होऊन फाटले होते. बाजीराव रस्त्यावर ही महिला रात्री ११ च्या सुमारास थंडीने कुडकुडत पडली होती. येथे जवळच राहणाऱ्या प्रणव गंजीवाले यांना ही वृद्ध महिला दिसली. त्यांनी तिची आपुलकीने चौकशी केली असता ती निराधार असल्याचे त्यांना समजले. लगेचच त्यांनी स्माईल फौंडेशन या सामाजिक संस्थेला संपर्क साधून त्या महिलेला वृद्धाश्रमात दाखल केले.
त्याचा सत्कार करताना पालकमंत्री बापट म्हणाले, आजची तरुण पिढी एका वेगळ्या मार्गाने जात आहे. आजच्या बहुतांश तरुणांमध्ये अहं भाव दिसून येतो. अशा परिस्थितीत प्रणव ने उपेक्षित आणि दुर्बल वृद्धेच्या सेवेसाठी निरपेक्षपणे केलेले काम अत्यंत स्तुत्य आहे. त्याच्या कामाचा इतरांनीही आदर्श घ्यावा. प्रणव सारख्या तरुणांचा सन्मान करून त्यांना चांगले काम करण्यासाठी आपण प्रोत्साहित केले पाहिजे. यामुळे आपला समाजाच्या व पर्यायाने देशाच्या प्रगतीला हातभार लागेल. असे ही ते म्हणाले.