जिल्ह्यातील महामार्गाच्या कामांना गती देणार: पालकमंत्री गिरीश बापट
पुणे : जिल्ह्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती देणार असून यासाठी विविध विभागांशी समन्वय साधत त्वरित कामे पूर्ण करावीत अशा सूचना राष्ट्रीय महामार्ग समन्वय समितीचे अध्यक्ष तथा पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या.
राष्ट्रीय महामार्ग समन्वय समितीची पहिली बैठक आज पुणे येथे पार पडली. या बैठकीला विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव,पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रवीण किडे, महावितरणचे मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे एस.डी. चिटणीस यांच्यासह अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
रस्त्यांच्या कामाला गती प्राप्त होण्यासाठी या कामांचे टप्पे करून सूक्ष्म नियोजन करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले.तसेच रस्त्यांच्या कामाचा विभागानुसार आढावा घेतला.
पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गाचे काम रिलायन्स इन्फ्रा या कंपनी मार्फत सुरु आहे. या कामासाठी आवश्यकता भासल्यास पोलीस संरक्षण देण्याची तयारी जिल्हाधिकारी सौरव राव यांनी देऊन सुद्धा या रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण आहे. सदर रस्त्याचे उर्वरित काम तात्काळ सुरु करावे. अन्यथा रिलायन्स इन्फ्रा कढून हे काम काढून घ्यावे अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली.
नाशिक फाटा ते इंद्रायणी नदी या रस्त्यासाठी लागणारी 80 टक्क्यांहून अधिक जमीन ताब्यात आली आहे.त्याचप्रमाणे या मार्गातील प्रस्तावित बीआरटी मार्ग पिंपरी चिंचवड महापालिकेने काढून टाकल्याने काम सुरु करण्यात अडथळा येणार नाही.इंद्रायणी नदी ये खेड या रस्त्याच्या भूसंपादनाचा निवाडा प्रक्रिया अंतिम टप्यात असून या महिना अखेर सर्व निवाडे जाहीर केले जातील असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे या कामाचे टेंडर लवकरात लवकर काढून 1 जानेवारी पर्यंत काम सुरु करण्याच्या सूचना दिल्या.
चांदणी चौक ते ताम्हिणी घाट रस्त्याच्या भूसंपादनाच्या स्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. तळेगाव चाकण शिक्रापूर नावरा चौफुला या रस्त्यावरून शहरात येणारी अवजड वाहतूक वळवता येऊ शकते त्यामुळे या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु करावे तसेच या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करणार आल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितलं.
ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या कामाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांबाबत दर पंधरा दिवसांनी आढावा घेण्यात येईल. जिल्ह्यातील रस्त्याच्या प्रलंबित कामाबाबत जबाबदारी निश्चित करून काम जलद गतीने पूर्ण होईल या करिता योग्य ते नियोजन करावे, कामामध्ये काही अडचणी असल्यास त्याबद्दलचा सविस्तर आढावा माझ्याकडे सादर करावा. सर्व विभागांनी समन्वय ठेवून तात्काळ अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करावा असेही या वेळी पालकमंत्री म्हणाले.