पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्ष पदावर आज दिलीप वळसे पाटील यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर त्यांनी संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार व संचालक मंडळाचे आभार व्यक्त केले.
श्री वळसे पाटील म्हणाले, की गेल्या काही दिवसापासून दुष्काळामुळे ऊसाचे क्षेत्र कमी झाले आहे. मात्र आता परिस्थिती सुधारून ऊस लागवड क्षेत्रामध्ये वाढ होत आहे. हे समाधानकारक चित्र आहे. ऊस उत्पादनासह तंत्रज्ञानावर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) या संस्थेने देशात चांगले संशोधन केले आहे. आता जेष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेला जागतिक पातळीवर नेण्यासाठी भविष्यात प्रयत्न करणार आहे. देशाच्या विविध भागातील भौगोलिक क्षेत्राचा अभ्यास करून तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवून, उसाचे प्रती हेक्टरी उत्पादन वाढवण्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात साखर उत्पादन वाढवून देशाला साखरेच्या उत्पादनात जगात प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ही ते यावेळी म्हणाले.
दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष आहेत. त्याच बरोबर राज्य सहकारी संस्थेचे संचालक आहेत. त्यांच्या निवडीने एका तज्ञ संचालकाची उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे.
महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ही संस्था स्थापन केली आहे. ऊस उत्पादकांना मार्गदर्शन करणारी ही एकमेव संस्था आहे. साखर उद्योगाच्या सर्वंकष प्रगतीसाठी ही संस्था प्रयत्न करते. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाद्वारे व्हीएसआयला संशोधन केंद्र म्हणून ओळखले जाते.