पिंपरी ता. : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करुन त्याचा फायदा केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर समाजाला करुन देणाऱ्या व्यक्तिमत्वांना गोयल गंगा फाउंडेशनच्या वतीने गुरुवर्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. येत्या १८ तारखेला वल्लभनगर येथील गोयल गंगा इंटरनैशनल स्कुलच्या आवारात हा कार्यक्रम पार पडेल, अशी माहिती गोयल गंगा फाऊंडेशनचे विश्वस्त जयप्रकाश गोयल यांनी दिली.
कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देताना गोयल गंगा फाऊंडेशनच्या विश्वस्त सोनू गुप्ता यांनी सांगितले की, गोयल गंगा फाऊंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या गुरुवर्य पुरस्कारांचे वितरण पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या शुभहस्ते होणार आहे. एकूण ५ विभागात हे पुरस्कार देण्यात येतील. सायंकाळी ४ ते ८ या वेळेत हा सोहळा पार पडेल. चाणक्य पुरस्कार(वक्तृत्व क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीसाठी) ,खाशाबा जाधव पुरस्कार (क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीसाठी),सावित्रीबाई फुले पुरस्कार (सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीसाठी),डॉ. अब्दुल कलाम (विज्ञान क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीसाठी ) वेदव्यास पुरस्कार (साहित्य क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीसाठी ) या विभागात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. साहित्य, क्रीडा, विज्ञान अशा क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून यासंबंधीची माहिती विविध शाळांमध्ये देण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी अतुल गोयल म्हणाले की, या पुरस्कारासाठी निवड प्रक्रिया आहे. संभाजी पाटील, चिनू अग्रवाल, कौस्तुभ राडकर, किरण मोघे, मल्लिका साराभाई, ऑलिव्ह दास, सुचेता भिडे-चाफेकर, नंदिनी मांजरेकर, विनिता देशमुख, एस. बी. मंत्री, रिता सिंग आदी परिक्षकांकडून विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे.
तसेच पुरस्कार सोहळ्यापुर्वी शिक्षण क्षेत्रातील बदल, नावीण्यपूर्णता यासंदर्भात चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय परिषदेचे आयोजनही संस्थेतर्फे करण्यात आले आहे.हि परिषद ९ ते ३ या वेळात पार पडेल. इंटरडिसीप्लिनरी स्कूल ऑफ हेल्थ सायन्सेसचे संचालक प्रोफेसर भूषण पटवर्धन, विज्ञान आश्रमाचे संचालक योगेश कुलकर्णी, आत्मन अॅकॅडमीच्या संस्थापक- संचालिका मंजुश्री पाटील, प्रेरणादायी मार्गदर्शन करणारे जेरोनिनो अल्मेडा, भरत अग्रवाल विश्वकर्मा इन्स्टिटूटचे अध्यक्ष,गोयल गंगा डेव्हलपर्सचे व्यवस्थापकीय संचालक अतुल गोयल,
महाराष्ट्र कॉस्मोपोलिटीयन एज्युकेशन सोसायटीचे पी. ए. इनामदार यांसारखे शिक्षण क्षेत्रातील तज्ञ या राष्ट्रीय परिषदेत सहभागी होणार असल्याची माहिती सोनू गुप्ता यांनी दिली.
पुरस्कार सोहळा म्हणजे केवळ सन्मान नसून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन मिळण्यासाठी दिलेली कौतुकाची थाप असल्याचेही गोयल यांनी आवर्जून नमूद केले.