पुणे : संस्कार नाही मिळाले तर माणसातील माणुसकी संपेल. माणुसकी जपण्यासाठी संस्कार जपणे आवश्यक आहे. रक्षाबंधन सारख्या कार्यक्रमातून असे संस्कार आपण कायमच जतन करत असतो. त्यामुळे एकत्रित येऊन सण उत्सव साजरे केले पाहिजेत. असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. कसबा मतदार संघात आज सफाई कामगारांसोबत रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी ते बोलत होते.
यावेळी वैशाली नाईक, अश्विनी पवार, आशा शिंदे, सुनिता भागवत, निर्मला कदम, मदिना तांबोळी, अशोक येनपुरे,नगरसेवक राजेश येनपुरे, महेश लडकत, योगेश समेळ, हेमंत रासने, सुलोचना कोंढरे सम्राट थोरात, अजय खेडेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
श्री बापट म्हणाले, सफाई कामगार हे परिसर स्वच्छ करण्याचे काम करत असतात. त्यांच्याविषयी आदर असलाच पाहिजे. मात्र समाजाची अजूनही अशी मानसिकता दिसून येत नाही. ही मानसिकता बदलली पाहिजे. स्वच्छता ही सर्वांसाठी गरजेची आहे. त्यामुळे त्यांच्या सोबत सर्वांनी मिळून हे काम केल पाहिजे. तरच आपल्याला उत्तम आरोग्य लाभेल.
हिंदू संस्कृतीमध्ये साजऱ्या होणाऱ्या सन उत्सवा पाठीमागे एक तत्वज्ञान आहे. म्हणूनच इतर देशांच्या पेक्षा आपली संस्कृती वेगळी आहे. या संस्कृतीचे पावित्र्य टिकवण्यासाठी हे सण आपण साजरे करत असतो. आज महिलांना सर्व क्षेत्रात समान संधी उपलब्ध झाली आहे. तरीही त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक असते. हे प्रोत्साहन देउन त्यांच्या प्रयत्नांना आणखी बळ देण्यासाठी भाजप सरकार कायमच प्रयत्नशील असते. महिलांच्या प्रगतीसाठी सरकारने अनेक योजना आणल्या आहेत. यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढला आहे. याच आत्मविश्वासाच्या जोरावर महिला अनेक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करतील असा विश्वास हि त्यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रास्तविक वैशाली नाईक यांनी केले. ओवाळणी म्हणून आपला परिसर स्वत: स्वच्छ ठेवण्यासाठी सफाई कामगारांसोबत काम करणार असल्याचे त्यांनी प्रास्तविकात सांगितले. आभार क्रांती ठाकूर यांनी मानले.

