इंडस्ट्रीज असोसिएशन व प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक
पुणे: हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कच्या समस्या सोडवण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखणार असून, या बाबत काम करणाऱ्या विविध विभागांमधील समन्वयासाठी जिल्हाधिकारी समन्वयक म्हणून काम करतील अशी घोषणा पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली. हिंजवडी येथील आयटी पार्कला त्यांनी नुकतीच भेट देवून तेथील उद्योजक आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
हिंजवडीतील उद्योग कंपन्यांची संघटना असलेल्या हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन (एचआयए) च्या कार्यालयात विविध शासकीय विभागांच्या प्रमुखांची श्री बापट यांनी बैठक घेतली.या बैठकीला जिल्हाधिकारी सौरभ राव, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अच्युत हांजे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगर नियोजन विभागाचे उपसंचालक प्रकाश ठाकूर, परिवहन विभागाचे कार्यकारी अभियंते श्रीकांत सावने, ज्ञानदेव जुंधारे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी संतोषकुमार देशमुख, कार्यकारी अभियंते सुधीर नागे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंते प्रवीण किडे, कार्यकारी अभियंते धनंजय देशपांडे, झोन तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, वाहतूक पोलीस विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेंद्र भामरे, उपायुक्त अशोक मोराळे, हिंजवडीचे पोलीस निरीक्षक अरुण वायकर, वाहतूक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांच्यासह अन्य शासकीय अधिकारी उपस्थित होते. एचआयएच्या वतीने असोसिएशनचे अध्यक्ष अनिल पटवर्धन, सचिव डॉ. सतीश पै, व्यवस्थापन समितीचे इतर सदस्य, तसेच मुख्य कार्यवाहक अधिकारी आणि टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रो इत्यादी प्रमुख आयटी कंपन्यांच्या केंद्र प्रमुखांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बैठकीत सहभाग घेतला.
दोन तासाहून अधिक चाललेल्या या बैठकीदरम्यान पालकमंत्र्यांना एचआयएने प्रमुख पायाभूत सुविधांसह रस्ते, पार्किंग, वाहतूक, सुरक्षा आणि घनकचरा व्यवस्थापन आदी समस्यांबाबत माहिती दिली. त्याचप्रमाणे या समस्या सोडवण्यासाठी अल्प,मध्यम आणि दीर्घकालीन उपाययोजना सुचवल्या. या समस्या सोडवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगून, पालकमंत्र्यांनी त्यासाठी एक कालबद्ध कार्यक्रम तयार करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिली. जिल्हाधिकारी विविध विभागांदरम्यान समन्वय ठेवतील,असेही ते म्हणाले. या समस्यांबद्दल दर दोन महिन्यांनी आढावा बैठक घेण्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. या संदर्भात पुढील बैठक सप्टेंबर महिन्यात अपेक्षित आहे.