राळेगणसिद्धी ता. १: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा, अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांना अन्न व नागरी पुरवठा तसेच अन्न व औषध विभागात राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. या विभागात संगणीकृत योजना राबवून पारदर्शी व्यवहार करण्यात येत असल्याबद्दल अण्णांनी समाधान व्यक्त केले. यावेळी नगर जिल्ह्यातील पहिल्या ई पॉस मशीनचे उद्घाटन राळेगणसिद्धी येथे त्यांच्या हस्ते करून लाभार्थ्यांना प्रत्यक्ष धान्यवाटप करण्यात आले.
यावेळी मंत्री बापट म्हणाले, अण्णांनी सर्व सामान्य लोकांना धान्य मिळण्यासाठी अनेक आंदोलने केली आहेत. त्यामुळे मंत्री झाल्यानंतर मी अण्णांना भेटण्यासाठी आलो होतो. अण्णांनी सर्व सामान्यांना धान्य मिळावे तसेच कोणीही अन्नधान्यापासून वंचित राहू नये यासाठी काही सूचना केल्या होत्या. त्या सूचनांची अंमलबजावणी माझ्या विभागाकडून करण्यात येत आहे. या विभागात काही अपप्रवृत्ती शिरल्या होत्या. यामुळे धान्याचा काळाबाजार होत होता. यामुळे गरजू पर्यंत धान्य पोहचत नव्हते. त्यामुळे काळाबाजार थांबवून या विभागात पारदर्शकता आणण्याचे आव्हान आमच्यापुढे होते. त्यामुळे हे थांबवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात संगणीकृत प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यामुळे धान्याचा ट्रक गोदाम मधून भरून शेवटच्या रेशनिंग दुकानात रिकामा होई पर्यंत सर्व माहिती उपलब्ध होत आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक लाभार्थ्याला बायोमेट्रिक पद्धतीने धान्य देण्यात येत असल्याने लाभार्थ्याला त्याच्या गरजे पुरते धान्य उपलब्ध होते. त्याला नको असलेले धान्य दुकानात शिल्लक राहते मात्र त्याचा काळा बाजार होत नाही. याबरोबरच रेशनिंग दुकानदारांनाही फायदा होणार आहे. यासाठी त्यांचे कमिशन वाढवून देण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन आहे.त्यांना फायदा व्हावा यासाठी त्यांना भाजी पाला , बी बियाणे तसेच इतर धान्य विक्री करण्यासाठी परवानगी दिली आहे. बँकेचे स्थानिक प्रतिनिधी म्हणून देवाण घेवाण करण्याची सुविधा ई पॉस मशीन वापरून केल्यास दुकानदारास उत्पन्नाचा वेगळा मार्ग उपलब्ध होणार आहे. या निर्णयामुळे दुकांदारांचाही फायदा होणार आहे. अशी माहिती त्यांनी दिली. यावर अण्णांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, अशा प्रकारच्या योजना राबवल्यामुळे शेवटच्या व्यक्तीपर्यंत धान्य पोहचेल. पर्यायाने महाराष्ट्रात अन्न सुरक्षा योजनेची काटेकोर अंमलबजावणी करणे शक्य होईल.
———————————————-