पुणे : सर्वच क्षेत्रात अग्रेसर असणारे पुणे स्मार्ट नसून ते स्मार्टेस्ट शहर आहे. पुण्याने केलेल्या प्रगतीमुळे या शहराची भारतात एक वेगळी ओळख निर्माण होत आहे. इस्राईली तंत्रज्ञानामुळे या शहराचा आणखी वेगाने विकास होण्यास मदत होईल. यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी इस्राईलचे राजदूत डॅनिएल कारमॉन यांनी दर्शवली. पुणे भेटीवर आलेल्या इस्राईलच्या शिष्टमंडळाने आज शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री गिरीश बापट यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात डॅनिएल कारमॉन यांच्यासह इस्राईलचे वाणिज्य राजदूत (कॉंन्सुलेट जनरल) डेव्हिड अकोव इस्त्राईलच्या दिल्ली दुतावासातील राजकीय सल्लागार अदवा विलचिंस्की यांचा सहभाग होता.
या भेटी दरम्यान पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह महापौर मुक्ता टिळक,सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी पुण्याच्या सर्वांगीण विकासाबद्दल या प्रतिनिधी मंडळासोबत विस्तृत चर्चा केली.
श्री. बापट यांनी या प्रतिनिधी मंडळाचे स्वागत करून त्यांना पुण्याच्या सुरु असलेल्या विविध विकास कामांबद्दल माहिती दिली. पीएमआरडीए मार्फत पुण्याचा विकास करण्यात येणार आहे.यामध्ये इस्राईलचे तंत्रज्ञान वापरता आले तर अधिक चांगल्या पद्धतीने हा विकास साधता येईल. पुण्याला २४ तास पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी वाढत्या लोकसंख्येचा विचार करता भविष्यात पाण्याची साठवण करताना अडचणी येणार असून यासाठी प्रगत तंत्रज्ञान वापरावे लागेल. तसेच शेती विषयक तंत्रज्ञान, तसेच घनकचरा व्यवस्थापन या विषयात इस्राईल तंत्रज्ञानाची सहाय्य होईल. तसेच पुणे शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र म्हणून ओळखले जात असल्याने या क्षेत्रातही इस्त्राईलच्या ज्ञानाची मदत होईल असे मत व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताचा झपाट्याने विकास होत आहे. भारतातील प्रमुख शहरात पुण्याचा उल्लेख केला जातो. फक्त शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातच नव्हे तर सर्वच क्षेत्रात पुण्याने केलेली प्रगती कौतुकास्पद आहे.पुणे शिक्षणाचे माहेर घर असल्याने शेती, अभियांत्रिकी तसेच औद्यागिक क्षेत्रात नवनवीन संशोधन होत आहेत. या संशोधनात इस्त्राईलचे प्रगत तंत्रज्ञान वापरल्यास निश्चितच चांगले परिणाम दिसतील. असे मत डॅनिएल कारमॉंन यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात इस्राईल दौऱ्यावर जाणार आहेत यावेळी पाण्याविषयी जनजागृती करण्याचा महत्वपूर्ण करार दोन्ही देशांदरम्यान करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर स्टार्ट अप कंपन्यांना मार्गदर्शन तसेच त्यांच्या कौशल्य विकास करण्यासाठी मदत करण्याची ग्वाही देवून त्यांनी श्री. बापट यांना इस्राईल भेटीचे निमंत्रणही दिले.
डेव्हिड अकोव यांनी पाणी टंचाई वर मात करण्यासाठी आमचा पाण्याच्या पुनर्वापरावर जादा भर असल्याचे सांगितले. त्यामुळे औद्यागिक सांडपाण्याच्या पुनर्वापराबाबत पुण्यात प्रकल्प उभा करण्याची इच्छा व्यक्त केली.

