पुणे : केरळमधील मार्क्सवाद्यांकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप तसेच विरोधी कार्यकर्त्यांच्या हत्या होत आहेत. याला तेथील सरकारही मदत करत आहे. हे अमानवी कृत्य निंदनीय आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार हा राष्ट्रवादाचा विचार आहे. हा विचार हिंसाचाराने संपणार नाही. असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.
केरळ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत, या विरोधात प्रबोधन मंचच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धिक्कार मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या मोर्चाला खासदार अनिल शिरोळे यांच्यासह प्रबोधन मंचचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी ते म्हणाले, डॉक्टर हेडगेवारांनी राष्ट्रवादाचे रोपटे लावले होते. ही एक वैचारिक ठेवण आहे. जी आपल्या मातृभूमी करिता काय करावे हे सांगते. या रोपट्याचा आज विशाल वृक्ष झाला असून त्याची छाया आज संपूर्ण देशात पसरली आहे. जगातून आज कम्युनिस्ट विचार संपत चालले आहेत. पण कोठेतरी मूठभर असणारी ही माओवादी राष्ट्रवाद्यांना त्रास देत आहेत. याला सारा देश एकत्रित येऊन उत्तर देईल. पुणेही यात मागे राहणार नाही.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची हत्या झाली. त्यांच्या हत्तेनंतर हा विचार संपेल असे विरोधकांना वाटले होते. मात्र आज नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामुळे हा राष्ट्रवादी विचार देशभर उभा राहिला आहे. वैचारिक लढाईला आम्ही कधीही तयार आहोत मात्र हा हिंसाचार सहन करणार नाही. लोकशाहीने सर्वांना आपले विचार मांडण्याचा अधिकार दिला आहे. तुम्हीही तुमचे विचार जरूर मांडा मात्र लोकांनी ते मान्य केले पाहिजेत. अशा प्रकारे हिंसाचार करून तुम्ही तुमचे विचार लादत असाल तर एकाची हत्या केल्यावर शंभर राष्ट्रवादी विचाराचे कार्यकर्ते तयार होतील असेही ते म्हणाले.