चिंचवड : जनजागृती झाल्यामुळे दिवसेंदिवस गणेश उत्सवाला चांगले स्वरूप येत आहे. भविष्यात गणेश उत्सव आणखी चांगल्या पद्धतीने साजरा करून तो जास्तीत जास्त समाज उपयोगी होण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे आयोजित राष्ट्रीय पारितोषिक वितरण समारंभ येथील रामकृष्ण मोरे सभागृहात पार पडला.
या कार्यक्रमात तरूण मित्र मंडळ आकुर्डी,जयहिंद मित्रमंडळ निगडी, एस.के.एफ गणेशोत्सव मंडळ चिंचवड, समता मित्र मंडळ चिंचवड,पठारे लांडगे आळी तालीम व्यायाम मंडळ चिंचवड यांसह आणखी मंडळांना गौरवण्यात आले. यावेळी माजी आमदार मोहन जोशी, महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे,स्थायी समिती सभापती सिमा सावळे,सभागृह नेते एकनाथ पवार, मंडळाचे सरचिटणीस माणिक चव्हाण,सुनिल रासणे, पिंपरी शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांच्यासह नगरसेवक , गणेश मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री बापट म्हणाले, गेल्या २२ वर्षापासून दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट कडून गणेश उत्सवामध्ये चांगल काम करणाऱ्या मंडळांना पुरस्कार दिला जातो. मी नगरसेवक असल्यापासून या स्तुत्य उपक्रमासोबत जोडला गेलो आहे याचा मला अभिमान वाटतो. जनजागृती वाढत असल्याने गणपती उत्सवाचे ही स्वरूप दिवसेंदिवस समाजपयोगी होत आहे. लोकमान्य टिळकांच्या कल्पनेतील गणेश उत्सव आपण सध्या साजरा करत आहे. हा गणेश उत्सव आणखी विधायक पद्धतीने साजरा करण्यासाठी सर्वानी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. या काळात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. उत्सव कळात देखावे पाहण्यासाठी भरपूर लोक येतात त्यांना बँजो आणि स्पीकरचा त्रास होतो , यावर आपण मर्यादा आणल्या पाहिजेत. तसेच आत्ताच्या काळात महिलांसाठीही सुरक्षित वातावरण असले पाहिजे. गणेश उत्सव मंडळाकडून अनेक लोकोपयोगी कामे होत असतात अशा मंडळांना सरकार सुद्धा प्रोत्साहित करत असते, यासाठी सरकारकडून निधीची कमतरता भासत नाही. असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना खासदार श्रीरंग बारणे यांनी दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या विधायक उपक्रमाचे कौतुक केले. तर आमदार लक्ष्मण जगताप यांनी दगडूशेठ हलवाई ट्रस्ट मार्फत वर्षभर जनहिताची कामे केली जात असल्याचे सांगत त्यांचा आदर्श घेवून इतर मंडळांनी ही अशा कार्यात पुढाकार घेतला पाहिजे असे मत व्यक्त केले. मंडळाचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी प्रास्ताविक केले.

