पुणे : पर्यावरण दिनाचे औचित्य साधून क्रेडाई महाराष्ट्राने या वर्षभरात २ लाख रोपे लावण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला. या उपक्रमास
मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आणि निव्वळ ३ दिवसांत १५ हजार रोपांची लागवड संस्थेच्या सदस्यांनी केली. यात संस्थेच्या युवा आणि महिला वर्गाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सभासदांसाठी उपयोगी ठरणारी वृक्षारोपण मार्गदर्शक पुस्तिकाही यावेळी प्रसिध्द करण्यात आली.
या उपक्रमाविषयी क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष सुनील फुरडे म्हणाले की, क्रेडाई महाराष्ट्रच्या वतीने वृक्ष लागवड तसेच भविष्यात त्याचे संवर्धन हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. संस्थेच्या राज्यभरातील प्रत्येक सदस्याकडून स्थानिक पद्धतीने पिकवलेल्या प्रजातींच्या किमान ५० रोपट्यांची लागवड करण्यात येणार आहे. सर्व प्रमुख शहरांत प्रामुख्याने हा उपक्रम घेण्यात येत आहे. वड, पिंपळ, गुलमोहोर, सुबाभूळ आदी सावली देणाऱ्या व जास्त काळजी घ्यावी न लागणाऱ्या रोपांचा यामध्ये समावेश असेल. साधारणत: ८ ते १२ फूट उंच वाढणारी, रस्त्यांच्या दुतर्फा ही झाडे लावण्यास शहराच्या सौंदर्यात भर पडेल, तसेच प्राणवायूचा पुरवठा मुबलक झाल्याने पर्यावरणाचा समतोलही अबाधित राहील, हा त्यामागील आमचा प्रमुख उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, केवळ वृक्षारोपण यावरच न थांबता लावलेले प्रत्येक झाड जगवणे, वेळोवेळी त्याची निगा राखणे हे देखील आमचे कर्तव्य समजून सर्व सभासदांना त्या संदर्भात योग्य त्या सूचना संस्थेमार्फत दिल्या जात आहेत. लागवड होणाऱ्या प्रत्येक वृक्षाच्या जातीबद्दल पूर्ण मार्गदर्शक तत्त्वे आम्ही प्रसिध्द केली आहे.
कोरोना महामारीने आपल्याला मोठा धडा शिकविला. निसर्गाकडून सहज उपलब्ध असणाऱ्या ऑक्सिजनसाठी आपल्याला अक्षरशः संघर्ष करायला लागला. कोरोना भविष्यात महामारी म्हणून राहणार नसला तरी जागतिक तापमानवाढीचे मोठे संकट आजही आपल्यावर आहे. याचे गांभीर्य ओळखूनच शहरी वनीकरणासाठी आम्ही केलेला हा प्रामाणिकपणे प्रयत्न आहे. संस्थेच्या सदस्यांकडूनही या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत, क्रेडाई महाराष्ट्र व शहरनिहाय क्रेडाई संस्थेच्या वतीने दरवर्षी वृक्षारोपण उपक्रम राबविला जातो, या उपक्रमास संस्थेचे सदस्य मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात, असेही फुरडे यांनी नमूद केले.

