पुणे : ता.29. लॉकडाऊनच्या काळात सामाजिक दायित्वाची जबाबदारी स्वीकारून कॅटॅलिस्ट फाउंडेशनने शहरातील एक हजार कुटुंबांना शिधा वाटप केले आहे. याद्वारे त्यांनी अनेक गरजूंना मदतीचा हात देऊ केला आहे.
कोरोना या महाभयंकर आजारामुळे देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांच्या जेवणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अशा लोकांना अडचणीच्या काळात मदत करण्याच्या भावनेने कॅटॅलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांनी एक हजार कुटुंबियांना शिधा देण्याचा संकल्प केला होता. ताडीवाला रस्ता, विश्रांतवाडी, येरवडा, बोपोडी, दापोडी,खडकी बाजार, औंध रस्ता,गोखले नगर, दत्तवाडी, मंगळवार पेठ येथील सुमारे एक हजार कुटुंबियांना मदत करून त्यांनी आज हा संकल्प पूर्णत्वास नेला. त्याचप्रमाणे फाउंडेशन मार्फत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या 200 विद्यार्थांना फूड पॅकेट्स देण्याचे काम अविरतपणे सुरु आहे.
या उपक्रमाबद्दल माहिती सांगताना संस्थेचे अध्यक्ष सुनील माने म्हणाले, कॅटलिस्ट फाउंडेशन मार्फत बाबसाहेबांच्या जयंती निमित्त त्यांचे विचार सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहचवण्यासाठी चित्ररथ रॅलीचे आयोजन केले
होते. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येणार होती. कोरोना वर मात करण्याची सामाजिक जबाबदारी ओळखून यावर्षीची ही रॅली आम्ही रद्द केली आहे. मात्र संकटाच्या काळात माणसाला मदत करणे ही बाबासाहेबांची शिकवण आहे. त्यामुळे बाबसाहेबांच्या जयंतीसाठी राखून ठेवलेला निधी गरजूंसाठी वापरून बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्याचा आम्ही प्रयत्न केला. यामुळेच ज्यांची हातावरची पोटं आहेत, जे रोजंदारी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात अशा एक हजार कुटुंबांना आमच्या संस्थेमार्फेत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. या वस्तूंमध्ये गव्हाचे पीठ, तांदूळ, तूरडाळ, खाद्यतेल, साखर, चहा पावडर, मीठ, हळद, मसाला, जिरे, मोहरी, कांदे, बटाटे आणि अर्धा डझन अंडी अशी सामग्री होती. आज एक हजार कुटूंबियांना मदत दिली असली तरी या पुढेही आवश्यकतेनुसार लोकांना मदत करतच राहू. याबरोबरच या काळात रुग्णांना रक्ताचा तुटवडा जाणवत असल्यामुळे आम्ही रक्तदान ही केले आहे. तसेच आजारापासून वाचण्यासाठी जनजागृतीचे काम ही आम्ही अविरतपणे करत आहोत.
या कामात संस्थेचे सदस्य सिद्धार्थ गायकवाड, समीर भुते, मिलिंद मोरे, राजू परदेसी,रमाकांत कापसे,संतोष भिसे, विजय बनसोडे, अमोल छडीदार,अनिल माने यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मदत करत आहेत. खासदार गिरीश बापट या संस्थेचे पालक तर लेफ्टनंट जनरल (नि) डी. बी. शेकटकर या संस्थेचे मेंटॉर आहेत.
कॅटॅलिस्ट फाउंडेशनमार्फत 1000 गरजूंना शिधा वाटप
Date:

