पुणे : माझ्या जडणघडणीत बी.एम.सी.सी महाविद्यालयाचा मोलाचा वाटा आहे. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी शिकलो त्यांचा सत्कार करताना मला आज विशेष आनंद होत आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. बी.एम.सी.सी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेमार्फत प्राइड ऑफ बी.एम.सी.सी पुरस्कार देवून शहीद मेजर कुणाल गोसावी आणि अॅडव्होकेट भास्करराव आव्हाड यांना पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते गौरवण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात बी.एम.सी.सी महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक प्रा. प्र.चिं शेजवलकर आणि प्रा. चिं.ग वैद्य यांना गुरुवर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याव्यतिरिक्त शहीद मेजर कुणाल गोसावी पुरस्काराने लेफ्टनंट कर्नल ओंकार बापट यांना तसेच व्यापारभूषण पुरस्काराने धन्यकुमार चोरडिया यांना गौरवण्यात आले. याशिवाय निपुण धर्माधिकारी,गंगाधर संगोराम, विद्याधर कुलकर्णी,नितीन किर्तने, योगेश धाडवे, व सुनिल गुदगे यांनाही पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत रावळ, प्रा. शाळीग्राम,सुधीर गाडगीळ, माजी विद्यार्थी संघाचे कार्याध्यक्ष अरुण निम्हण, युवराज शहा, शरद कुंटे यांच्यासह महाविद्यालयाचे आजी – माजी शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी आपला प्रवास उलगडताना पालकमंत्री बापट म्हणाले, महाविद्यालयात असताना मी वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतला होता. पण तेथे मला भाषण करता आले नाही. त्यावेळी मी मनाशी आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याचा निश्चय केला. आणि त्याच जिद्दीने मी नगरसेवक ते कॅबिनेट मंत्री असा प्रवास करू शकलो. त्यामुळे बी.एम.सी.सी महाविद्यालय हे माझे स्फूर्तीस्थान आहे अस म्हणाव लागेल. या महाविद्यालयाने राजकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रात तज्ज्ञ असणारे अनेक दिग्गज लोक दिलेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या जडण – घडणीत बी.एम.सी.सी. महाविद्यालयाचा सिंहाचा वाटा आहे असे मला अभिमानाने सांगावे वाटते.
आज या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असणाऱ्या मेजर कुणाल गोसावी यांच्या वीर मातापिता आणि पत्नीचा तसेच मला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करायला मिळाला हा खरं तर माझा सन्मान आहे. असही ते यावेळी म्हणाले.
सत्काराला उत्तर देताना अॅडव्होकेट भास्करराव आव्हाड यांनी या सत्काराने जबाबदारी वाढल्याचे सांगितले. तर प्रा.वैद्य यांनी माजी विद्यार्थांनी केलेल्या या सत्काराने भारावून गेल्याचे मत व्यक्त केले. प्रा. शेजवलकर यांनी या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
बी.एम.सी.सी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेमार्फत मेजर कुणाल गोसावी यांच्या वीर पत्नीला मदत म्हणून एक लाखाचा धनादेश देण्यात आला. तर पालकमंत्री बापट यांनी महाविद्यालयाला दोन लाख रुपयांची मदत दिली.

