पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने विस्तारीकरणाच्या कामांचा ‘टेक ऑफ’
पुणे: जागेअभावी लोहगाव विमानतळावर येणारा ताण लक्षात घेऊन विमानतळ प्राधिकरणाला एकूण १८ एकर जागा देण्याची महत्वपूर्ण घोषणा संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी बुधवारी केली. नवी दिल्ली येथे परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आज विमानतळ विस्तारीकरणाची बैठक पार पडली.
या बैठकीला मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर , पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे सदस्य (नियोजन) एस. रहेजा व अन्य अधिकारी उपस्थित होते. महापालिका निवडणुकीची जबाबदारी पार पाडून पुण्याचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याकरता आज पालकमंत्री बापट दिल्लीला गेले होते. त्यांच्या पुढाकाराने गेली १७ वर्षे प्रलंबित असलेल्या विमानातळाच्या प्रश्नांना ‘टेक ऑफ’ मिळाला.
या बैठकीनंतर माहिती देताना पालकमंत्री बापट म्हणाले की, “पुणे विमानतळासाठी अतिरिक्त अठरा एकर जागा देण्यास संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज तत्वत: मान्यता दिली. या आधी १५. ८४ एकर जागा देण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. परंतु अतिरिक्त जागेची गरज ओळखून त्यांनी आता १८ एकर जागा देण्याचे मान्य केले. विमानतळावरील इंधन साठा अन्यत्र तीन एकर जागेत हलविण्यात येईल. यासाठी विमानतळ प्राधिकरण आणि हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यामार्फत लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. ”
यावेळी लोहगाव विमानतळाला आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यासाठी राज्य शासन आणि पुणे महापालिकेकडे प्रलंबित असलेल्या विषयांवर पालकमंत्री बापट आढावा दिला. पुण्याच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी पालकमंत्र्यांना दिली.
दिल्लीवारी फलदायी : बापट
बायोमेट्रीक पद्धतीने गरजुंना धान्यवाटप करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्राच्या अन्न, औषध प्रशासन विभागाने हाती घेतला आहे. त्यातील तांत्रिक अडचणी एनआयसी ( राष्ट्रीय माहिती केंद्र) द्वारे तातडीने दूर कराव्यात आणि हरियाणाच्या धर्तीवर हा विषय मार्गी लावावा, यासाठी पालकमंत्री बापट यांची माहिती तंत्रज्ञानमंत्री रवीशंकर प्रसाद यांच्या समवेत चर्चा झाली. विमानतळ विस्तारीकरणाची महत्वपूर्ण बैठक आणि मा. माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांच्याशी झालेली सकारात्मक चर्चा यामुळे आजची दिल्लीवारी फलदायी ठरल्याची भावना पालकमंत्री बापट यांनी येथे व्यक्त केली.