अध्यक्ष शांतीलाल कटारिया राज्य दौऱ्यावर, कामांचा घेणार आढावा
पुणे :-“प्रधानमंत्री आवास योजना व परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी क्रेडाई महाराष्ट्र सक्रीय पाऊले उचलत आहे. मुंबई वगळता संपूर्ण राज्यात ५ लाखांहून अधिक घरांच्या निर्मितीचे महत्वाकांक्षी लक्ष्य क्रेडाईने समोर ठेवले आहे. याचाच आढावा घेण्यासाठी क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया राज्यातील २५ शहरांमध्ये दौरा करणार आहेत.
येत्या १२ तारखेला इंदापूर,बार्शी,सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, १३ तारखेला बीड व नगर, सातारा, कराड, कोल्हापूर, कागल १७ तारखेस तर १८ ला सावंतवाडी,रत्नागिरी,चिपळूण असा दौरा नियोजित करण्यात आला आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र विदर्भ भागात मात्र पुढील महिन्यात त्यांनी योजिले आहे.
येत्या २०२२ पर्यंत ५ लाखांहून अधिक घरांची निर्मितीसाठी क्रेडाईने राज्य सरकारशी सामंजस्य करार केला आहे. यातील ३ लाखांहून अधिक घरांचे काम प्रगतीपथावर आहे. यास अल्पावधीत मूर्त रूप प्राप्त होण्याच्या उद्देशाने, प्रत्येक शहरातील कामाचा आढावा, या योजनेअंतर्गत काम करताना विकासकांना येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन त्या सर्वातोपरी सहकार्य करण्याच्या हेतूने कटारिया यांनी हा दौरा निश्चित केला आहे.
कटारिया पुढे म्हणाले कि, रेरा अंतर्गत प्रकल्पांची नोंदणीचा आढावा ते घेणार असून त्यासंबंधीच्या अडचणींविषयी मार्गदर्शन करणार आहेत. या दौऱ्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेला बळ देणाऱ्या क्रेडाई महाराष्ट्राच्या या उपक्रमात राज्य शासनाने अधिक सवलती देऊन संबंधित मंजुरीना गती द्यावी या संबंधीचा प्रस्तावही शासनास क्रेडाई महाराष्ट्र सादर करणार आहे.