क्षणिक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान
पुणे- सध्याच्या शैक्षणिक प्रणालीतील त्रुटी लक्षात घेऊन त्यात आमूलाग्र बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने कार्यरत असलेल्या व्यक्ती आणि संस्था यांना नुकतेच गोयल गंगा फाऊंडेशनतर्फे गुरुवर्य पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात हा सोहळा पार पडला.
केवळ पुस्तकी ज्ञानावर भर न देता मुलांच्या अंगभूत गुणांना वाव देत वेगळाच आदर्श प्रस्थापित केलेल्या राळेगणसिद्धी येथील संत निलोबराय विद्यालयाचे मुख्याध्यापक तुकाराम वाघचौरे, ग्रामीण भागातही शहरी दर्जाचे शिक्षण पोहोचण्याच्या तळमळीने कार्यरत असलेले रणजितसिंग देसले, भारतीय शिक्षण पद्धतीतील मूल्यांचे महत्व पटवून देण्यासाठी झटणारे इस्कॉन फाऊंडेशन, विशेष शिक्षण पद्धतीचा आग्रह धरत शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी
करणाऱ्या मंजुश्री पाटील आणि मुलांना शिक्षण जबरदस्तीचे न वाटता त्यात त्यांना गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने नाविन्यपूर्ण कल्पनांचा ध्यास घेतलेल्या विपुल शहा यांना यावेळी गुरुवर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गौरांग प्रभूजी, कर्नल संभाजी पाटील, स्वाती चाटे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.यावेळी गोयल गंगा फाऊंडेशनचे विश्वस्त अमित गोयल, गीता गोयल, गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका सोनू गुप्ता, मुख्याध्यापिका भारती भागवाणी, हे देखील उपस्थित होत्या.
गुरुवर्य पुरस्काराच्या निमित्ताने इतरही भरगच्च कार्यक्रमांचे यावेळी गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलच्या आवारात आयोजन करण्यात आले होते. डॉ. दीपक शिकारपूर यांच्या हस्ते उदघाटन झाल्यानंतर ‘बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्रात होणारे बदल वा त्यात येणारे अडथळे’ याविषयी देशभरातील शिक्षण तज्ज्ञांनी आपली मते मांडली. तसेच शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या एस बी मंत्री, डॉ अश्विनी कुलकर्णी,विजय गुप्ता, संजीव सोनावणे यांच्यातही याविषयी चर्चासत्र पार पडले. दुसऱ्या पर्वात चारित्र्य व विकासाचे महत्व याविषयी गौरांग प्रभूजी यांनी आपले मत मांडले. शाळेच्या विद्यार्थ्यानी मनोरंजनात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध कलागुणांचे उपस्थितांना दर्शन घडविले. तर अखेरच्या सत्रातील पुरस्कार वितरण सोहळ्याने या कार्यक्रमाची सांगता झाली.

