पुणे : जुना बाजार परिसरात होर्डिंग्ज पडून मृत झालेल्या शिवाजी परदेशी यांच्या कुटुंबियांची पालकमंत्री गिरीश बापट यांनी भेट घेतली. परदेशी यांची मुलगी समृद्धी हिला रेल्वेमध्ये नोकरी देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन पालकमंत्री बापट यांनी दिले.
या दुर्घटनेत शिवाजी यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नीचा आदल्या दिवशी मृत्यू झाला. ही घटना दुर्देवी आहे. पण यातून सावरले पाहिजे. या कठीण प्रसंगात आम्ही सर्व कार्यकर्ते या कुटुंबियांच्या पाठीमागे भक्क्मपणे उभे राहू. परदेशी यांची मुलगी समृद्धी आता सतरा वर्षाची आहे तर मुलगा समर्थचे वय आता चार वर्ष आहे. समृद्धीला रेल्वे मध्ये नोकरी लागल्यास या कुटुंबाचा चरितार्थ व्यवस्थित चालेल. पण यासाठी किमान आणखी एक वर्ष थांबावे लागेल. यासाठी खासदारांच्या मार्फत पाठपुरावा करण्याचे आश्वासन यावेळी बापट यांनी दिले. परदेशी यांची आई आजारी असल्याने तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या औषधोपचाराचा खर्च करणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे राज्य शसनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. शासनाची मदत मिळेपर्यंत कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी मदत देणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

