‘जीजीएफ फॉर हर’पोर्टलच्या उदघाटनप्रसंगी महिलांना सल्ला
पुणे : महिलांनी प्रत्येक क्षेत्रात स्वत:ला सिद्ध केले असले तरी दुसरीकडे मात्र संकोचित मनोवृत्ती आणि न्यूनगंड बाळगून जगणाऱ्या अनेक महिला आपल्या समाजात आहेत. त्यामुळे प्रत्येक महिलेने आपल्यातील कमतरतेवर मात करून स्वत:ची खरी ताकद ओळखली पाहिजे, असा सल्ला पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी येथील कार्यक्रमात महिलांना दिला.
गोयल गंगा फाउंडेशनतर्फे ‘जीजीएफ फॉर हर’ या पोर्टलचे उदघाटन रश्मी शुक्ला यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. गोयल गंगा फाउंडेशनच्या गीता गोयल, अमृता गोयल, अमित गोयल, सलोनी गोयल, आदी यावेळी उपस्थित होते. फाउंडेशनतर्फे बांधकाम क्षेत्रातील कामगार महिलांसाठी आधार कार्ड देण्याचा उपक्रम राबविण्यात आला होता. त्यातील काही प्रातिनिधिक महिलांनाही यावेळी रश्मी शुक्ला यांच्या हस्ते आधार कार्डचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी विद्यार्थीनींसाठी शिष्यवृत्ती सुरु करण्यात आली.
शुक्ला म्हणाल्या की, स्त्री आणि पुरुष एकाच रथातील दोन चाके आहेत. दोघांच्या एकत्रित प्रयत्नानेच आयुष्यातील ध्येय साध्य होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री अथवा यशस्वी स्त्रीमागे पुरुष असे म्हणता येणार नाही. कोणताही व्यक्ती जसा परिपूर्ण नाही तसा कमजोरही नाही. हे लक्षात घेऊन आपण आपल्यातील कमतरता दूर करुन परिपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करू शकतो, असेही मत त्यांनी यावेळी महिलांशी संवाद साधताना व्यक्त केले.
महिलांच्या समस्या केंद्रस्थानी ठेऊन महिलांनी, महिलांसाठी, महिलांकरिता सुरु केलेले हे पहिले वेब पोर्टल म्हणावे लागेल. येत्या काळात महिलांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न या पोर्टलच्या माध्यमातून फाउंडेशन करणार आहे. तसेच महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचाही फाउंडेशनचा मानस असल्याचे गीता गोयल यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा देशपांडे यांनी केले तर सलोनी गोयल यांनी आभार मानले.
प्रत्येक दिवस नवीन आव्हानांचा: शुक्ला
सर्वात जास्त मागणी असणारे क्षेत्र म्हणजे पोलीस खाते. त्यामुळे अशा क्षेत्रात काम करताना, कधी कोणत्या समस्यांचा सामना करावा लागेल याचा अंदाज कोणीच देऊ शकत नाही. येणारा प्रत्येक दिवसा नवीन आव्हाने घेऊन येणार असतो असे मत रश्मी शुक्ला यांनी व्यक्त केले.

