प्रारूप आराखडाही तयार, कटारिया यांची माहिती
पुणे – “परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी क्रेडाई महाराष्ट्र सक्रीय पाऊले उचलत आहे. मुंबई वगळता संपूर्ण राज्यात ५ लाखांहून अधिक घरांच्या निर्मितीचे महत्वाकांक्षी लक्ष्य क्रेडाईने समोर ठेवले आहे. पैकी सुमारे ३,२४,५०० घर बांधणीचे काम प्रगतीपथावर सुरू झाले असून क्रेडाई महाराष्ट्र आणि क्रेडाई पुणे मेट्रोच्या माध्यमातून ती बांधली जात आहेत. यासाठी प्रारूप आराखडाही तयार केला आहे.” अशी माहिती क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतिलाल कटारिया यांनी येथे दिली.
क्रेडाई महाराष्ट्रची वार्षिक सर्वसाधारण सभा आज येथे पार पडली. यावेळी ते बोलत होते. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष श्रीकांत परांजपे, क्रेडाई महाराष्ट्राचे सचिव अनुज भंडारी, क्रेडाई महाराष्ट्राचे शहरनिहाय अध्यक्ष, पदाधिकारी यांसह क्रेडाई महाराष्ट्राच्या ३९ शहरातील २००हून अधिक सदस्य यावेळी उपस्थित होते.कटारिया म्हणाले की, प्रधान मंत्री आवास योजनेनुसार, २०२२ पर्यंत ‘सर्वांना घर’ यास हातभार लावण्यासाठी क्रेडाई महाराष्ट्राने सक्रीय पुढाकार घेतला आहे. यामध्ये कागलपासून भंडारापर्यंत सर्व जिल्ह्यांचा समावेश केला आहे. या कल्पनेस मूर्त रुप प्राप्त होण्यासाठी तसेच इच्छुक विकसकांना यासाबंधी अचूक मार्गदर्शन मिळावे, यादृष्टीने प्रारूप आराखडाही संस्थेने आखला आहे. प्रधानमंत्री कार्यालयात लवकरच या प्रारूप आराखड्याचे सादरीकरण करण्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
बांधकामांच्या ठिकाणी होणारे अपघात कसे टाळता येतील, येथील सुरक्षिततेसंदर्भात सावधानता कशी बाळगावी, बांधकाम क्षेत्रातील जाणवणाऱ्या इतर अडचणींवर मात कशी करता येऊ शकते यासंदर्भात संदीप पाटील यांनी मार्गदर्शन केले. कुठलीही अडचण आल्यास पोलिसांशी संपर्क साधण्यास संकोच बाळगू नये तसेच
आपल्या प्रकल्पस्थळी अपघात झाल्यास घाबरून न जाता आपण दिलेले प्रशिक्षण, संबंधित दस्तऐवज, ध्वनीचित्रण आदी तयार ठेवावे, असा सल्ला देखील पाटील यांनी यावेळी दिला.
या सर्वसाधारण सभेत लिगल प्लॉटिंग, टुरिझम, क्रेडाई ब्रँडिंग, सिटी ब्रँडिंग या चार नवीन समित्यांची घोषणा करण्यात आली. परांजपे यांनी ‘बांधकाम क्षेत्राची सद्य:स्थिती’ याविषयी आपले मत मांडले.
क्रेडाई महाराष्ट्रतर्फे सदस्यांना प्रोत्साहन व प्रशिक्षण
राज्यातील प्रत्येक शहरात आम्ही परवडणाऱ्या घरांच्या बांधणीविषयी सदस्यांना प्रशिक्षण देत आहोत. राज्य सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या पीपीपी उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी आम्ही सदस्यांना प्रोत्साहित करत असल्याचेही कटारिया यांनी सांगितले.