राज्य सहकारी बँकेचे उद्घाटन
पुणे : आर्थिक शिस्त हीच सहकाराच्या माध्यमातून समाजाला पुढे नेईल. लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी कायदेशीर बाबींची कडक अंमलबजावणी करण्याचे आव्हान सहकारी बँकांसमोर असल्याने या दृष्टीने बँकांनी प्रयत्न करायला हवे.असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या पुणे शाखेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. एम. एल. सुखदेवे, राज्याचे सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी, नाबार्ड पुणे कार्यालयाचे मुख्य सरव्यवस्थापक डॉ. आर. एन. कुलकर्णी, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड, प्रशासकीय मंडळाचे सदस्य ए.ए. मगदूम आदींसह बँकेचे अधिकारी ,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री बापट म्हणाले, सहकार क्षेत्राला मोठी परंपरा लाभली असून ती टिकणे गरजेचे आहे. सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचवण्याकरिता व तळागाळातील लोकांपर्यंत विकासाची गंगा पोहोचविण्याकरिता सहकारी बँका सक्षम झाल्या पाहिजे. गेल्या काही वर्षात राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाने हे आव्हान पार करून बँकेला गतवैभव प्राप्त करून दिले. त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे आज राज्य सहकारी बँकेकडून जिल्ह्यातील आर्थिक संस्थाना मदत होत आहे. बँकेने केलेली ही प्रगती कौतुकास्पद आहे. भविष्यातही बँकेचा चढता आलेख कायम राहो यासाठी सरकार म्हणून नेहमी पाठीशी राहण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
कर्जमाफीच्या विरोधात आमचे सरकार अजिबात नाही शेतकरी म्हणजे आपल्या देशाचा आर्थिक कणा आहे. म्हणूनच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना कायमस्वरूपी कर्जमुक्ती देणे हे आमच्या सरकारचे ध्येय आहे. हे साध्य करण्यासाठी सहकारी बँकांची भूमिका महत्वाची ठरू शकते असे मतही या कार्यक्रमाच्या प्रसंगी त्यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना चंद्रकांत दळवी म्हणाले, राज्य सहकारी बँक हि सर्व सहकारी संस्थांची प्रमुख सर्व बँक आहे. सहकारी संस्था वाचवण्यासाठी राज्य सहकारी बँकाना फायदा होणे गरजेचे आहे. तर विद्याधर आनास्कर यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी राज्य सहकारी बँकेने पुढाकार घेवून दीर्घकालीन उपाय योजना केल्या पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली.