पुणे : महापुरुषांनी नव्या पिढीला आपल्या जगण्यातून आदर्श निर्माण करून दिले आहेत. त्यांच्या आदर्शांवर चालणे ही तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे. इतिहासातील एक आदर्शवादी आणि तत्ववादी योद्धा म्हणून छत्रपती संभाजी राजेंचे नाव घ्यावे लागेल. असे प्रतिपादन प्रा.नितीन बानगुडे पाटील यांनी केले. काल रविंद्र चव्हाण युवा मंचा तर्फे धर्मवीर संभाजीमहाराज उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. शनिवार वाड्याच्या प्रांगणात पार पडलेल्या या जयंती उत्सवाचे यंदाचे हे चौथे वर्ष होते. समाजात निरपेक्षपणे काम करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला कौतुकाची थाप मिळणेआवश्यक असते. या कौतुकामुळे त्यांना नवी उमेद मिळते आणि त्याच प्रेरणेने समाजासाठी निरंतर काम करत राहतो. हाच उद्देश समोर ठेऊन प्रत्येकवर्षी संभाजी महाराज जयंती निमित्त समाजात उत्तम कार्य करणाऱ्या संस्थाचा सत्कार रवींद्र चव्हाण युवा मंचाच्या वतीने करण्यात येतो. यावर्षी कसबा पेठेतील त्वांष्टा कासार महिला समाज संघ, लुई-ब्रेल अंध अपंग कल्याण संस्था, शिवतेज दहीहंडी संघ व भोईराज दहीहंडी संघ यांना प्रा.नितीन बानगुडे पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना बानगुडे पाटील म्हणाले की, इतिहास हा अनेकांच्या अभ्यासाचा, व्यासंगाचा, अभिमानाचा, स्वाभिमानाचा तसेच प्रेरणेचा विषय आहे. इतिहास हा विषय आपल्याला जागृत करणारा तसेच चिंतन करायला लावणारा विषय आहे. युगायुगातून युगप्रवर्तक माणसे निर्माण होत असतात जी तुम्हा आम्हाला वसा आणि वारसा देत असतात तो वसा जपणे आणि त्यांनी दिलेल्या आदर्शांवर चालत राहणे तुमची आमची सर्वात मोठी जबाबदारी आहे. छत्रपती संभाजी महाराज हे त्या व्यक्तीमत्वांपैकी एक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. तर ते स्वराज्य टिकवण्याचे आणि संवर्धित करण्याचे काम छत्रपती संभाजी राजांनी केले. त्यांचे जीवनकार्य सर्वसामन्यांना स्फूर्ती देणारे आहे.महाराजांनी स्वराज्याला नवी प्रेरणा दिली. हे फक्त वाचनातून आत्मसाद करण्यापेक्षा त्यांच्या कार्याचा आदर्श सर्वांनी घेऊन आपण सर्वांनी तो अंमलात आणला पाहिजे.यावेळी रविंद्र चव्हाण युवा मंचाचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण, नगरसेवक विशाल धनवडे, नगरसेविका पल्लवी जावळे, प्रशांत बधे, राजेंद्रनाना शिंदे, बाळासाहेब मालुसरे, राजेश बरगुज़े आदि उपस्थित होते.