राज्यभरातील ग्राहक मंचाचे अध्यक्ष आणि सदस्यांसाठी यशदा येथे एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी श्री. बापट बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्य ग्राहक मंच आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती ए. पी. मंगाळे आणि राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे उपस्थित होते.
श्री. बापट म्हणाले, बदलत्या परिस्थितीत ग्राहकांची कक्षा अधिकच विस्तारत आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांना न्याय मिळावा यासाठी ग्राहक मंच आणि त्यासाठीची आवश्यक यंत्रणा सक्षम होण्याची आवश्यकता आहे. यासाठी राज्य शासनाने मंचना आवश्यक असणारे मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी उपाय योजनेस सुरुवात केली आहे. ग्राहकांना फसवणाऱ्यांना आळा तर घातला पाहिजेच. त्याचबरोबर ग्राहकांनाही आपले हक्क आणि अधिकार यांची जाणीव करुन देण्यासाठी जागृती करायला हवी.
ग्राहक संरक्षण आणि कल्याण याबाबतीत कायद्यात सुधारणा आणि आवश्यक तेथे नवीन कायदे करण्यावर राज्य शासनाचा भर आहे. कालबाह्य कायदे बदलणे किंवा दुरुस्ती करण्यासाठी सूचनांचे स्वागत केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
राज्य ग्राहक कल्याण आयोगाच्या व्यवस्थापक अनुजा वैरागडे आणि समन्वयक अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी कार्यशाळेचे संयोजन केले.