पुणे : ज्येष्ठांना उतारवयात आनंददायी जीवन जगता यावे, त्यांना हक्काचा आधार मिळावा, संवादासाठी मित्र-मैत्रिणी मिळावेत, आरोग्याची, राहण्याजेवण्याची काळजी घेणारे सेवाभावी घर असावे, या उद्देशाने वंचित विकास संस्थेच्या वतीने लोहगावजवळील वडगाव शिंदे येथे नीहार आनंद निवासाची उभारणी करण्यात आली आहे. या नीहार आनंद निवासाचे उद्घाटन बांधकाम व्यावसायिक, देणगीदार विलास जावडेकर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, उपाध्यक्ष ऍड. तानाजी गायकवाड, कार्यवाह मीना कुर्लेकर व संचालिका सुनीता जोगळेकर, डॉ. श्रीकांत गबाले आदी उपस्थित होते. या निमित्ताने आयोजित स्नेहमेळाव्याला संस्थेचे सभासद, देणगीदार, हितचिंतक, कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. चाफळकर परिवार, अजित आणि सुजाता गजेंद्रगडकर, ज्योती जोशी, गौरी कुलकर्णी, स्वाती नातू, आर्किटेक्ट मंगेश देशपांडे, मंदाकिनी किंजवडेकर, ऍड. अंगद गिल, दशरथ काकडे, तुकाराम ठाकूर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
विलास जावडेकर म्हणाले, “चाफेकर आणि माझे या कामाबाबत बोलणे व्हायचे. त्यांच्या कामातील प्रामाणिकपणा, तळमळ पाहून यासाठी योगदान दिले. चाफेकरांच्या हयातीत याचे उद्घाटन झाले असते, तर त्यांना फार आनंद वाटला असता. त्यांना या निवासात राहायचे होते. परंतु, कोरोनामुळे उदघाट्न लांबले आणि चाफेकरांचे निधन झाले. या प्रांगणात त्यांचे स्मृतिस्थळ उभारले असल्याने त्या रूपात चाफेकर येथे कायम राहतील. इतर उपक्रमांप्रमाणेच यातूनही समाजहिताचे कार्य उभा राहील. येथील निसर्ग, उभारलेल्या सोयी-सुविधामुळे ज्येष्ठांना आपलेपणाची, आनंदाची भावना येथे मिळेल, असा विश्वास वाटतो.”
मीना कुर्लेकर म्हणाल्या, “वंचित विकास संस्थेचे संस्थापक विलास चाफेकर यांच्या प्रेरणेतून या नीहार आनंद निवासाची सुरुवात होत आहे. समाजाची गरज ओळखून संस्थेने आजवर प्रकल्प केले आहेत. जवळपास २५ वर्षे नीहारने मुलांच्या आयुष्याला आकार दिला आणि त्याची गरज संपली आहे, हे लक्षात घेऊन तो थांबवला. सद्यस्थितीत ज्येष्ठांचा प्रश्न सतावत असल्याने त्यांच्यासाठी आधार प्रकल्प उभारण्याचे ठरले. जावडेकर यांच्या मदतीने नीहार आनंद निवास उभा राहिले. “
ज्येष्ठांच्या आधारासाठी लोहगावजवळ नीहार आनंद निवासाची उभारणी
Date:

