पुण्याचे खासदार गिरीष बापट यांच्या घरासमोर पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने माफी मांगो आंदोलन.
पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत महाराष्ट्राचा अपमान करताना काँग्रेसमुळे देशात कोरोना पसरला असे सांगून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला व काँग्रेस पक्षाला दोषी ठरविले. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार आज पुणे शहराचे खासदार गिरीष बापट यांच्या घरासमोर पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे याच्या नेतृत्वाखाली ‘माफी मांगो आंदोलन’ करण्यात आले.यावेळी बोलताना शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘देशाचे पंतप्रधान संसदेसारख्या पवित्र ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला व काँग्रेस पक्षाला बदनाम करून कोरोनाचे खापर महाराष्ट्र व काँग्रेसच्या माथी फोडायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगा की शेतकऱ्यांचा अपमान केल्याबद्दल देशाची माफी मागावी लागली, तशी महाराष्ट्राच्या अपमानाबद्दल माफी मागावी लागेल. दिल्लीच्या सत्तेसमोर गुडघे टेकून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी खेळू नका, महाराष्ट्राची जनता कधीही माफ करणार नाही.’’ माजी आमदार मोहन जोशी म्हणाले की, ‘‘कोरोना काळात केंद्रातील भाजपा सरकारने अचानक लॉकडाऊन लावला. या कठीण प्रसंगी राज्यातील लोकांना केंद्र सरकारने मदत केली नाही पण काँग्रेस पक्षाने व महाराष्ट्र सरकारने लाखो लोकांना मदत केली. अडचणीच्या काळात मदत करणे ही काँग्रेसची परंपरा आहे. सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून हजारो लोकांना आम्ही मदत केली असताना कोरोना पसरवला, असा आरोप पंतप्रधानांनी करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा व महाराष्ट्राचा अपमान केला आहे. याप्रकरणी पंतप्रधान मोदींनी माफी मागावी.’’यानंतर प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे, रोहित टिळक, कमल व्यवहारे, गोपाळ तिवारी, नीता रजपूत, पूजा आनंद, विशाल मलके, मुख्तार शेख, बाळासाहेब अमराळे, प्रविण करपे, सचिन आडेकर, सतिश पवार, रमेश सोनकांबळे, विजय खळदकर, सुनिल घाडगे, अजित जाधव, द. स. पोळेकर, किशोर मारणे, नंदा ढावरे, रमा भोसले, सुंदरा ओव्हाळ, रवि आरडे, रवि पाटोळे, राजश्री अडसूळ, अंजली सोलापूरे, सिमा महाडिक, ज्योती परदेशी, ताई कसबे, परवेज तांबोळी, चैतन्य पुरंदरे, सुरेश कांबळे, अनुप बेगी, अविनाश अडसूळ, राजू गायकवाड व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

