पुणे – कोरोनामुळे उद्भवलेल्या संकटकाळात सरकारच्या मदतीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने टास्क फोर्स, आणि विविध उपसमित्यांची घोषणा केली आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही घोषणा केली.
राज्याचे माजी मुख्य मंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली १८ सदस्यांच्या टास्क फोर्सची स्थापना केली आहे. माजी खासदार भालचंद्र मुणगेकर त्याचे समन्वयक आहेत. यामध्ये सर्वश्री खासदार राजीव सातव, मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे ,माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री विलास मुत्तेमवार, आमदार संग्राम थोपटेआदींचा समावेश आहे.
विविध उपसमित्याही स्थापन केल्या असून शासकीय उपाययोजना अवलोकन उपसमितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माजी खासदार रजनीताई पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे आणि प्रदेश काँग्रेस सरचिटणीस माजी आमदार मोहन जोशी समन्वयक असतील. समितीचे सचिव म्हणून अमर खानापूरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीमध्ये सर्वश्री माजी मंत्री आणि ज्येष्ठ आदिवासी नेते वसंत पूरके, माजी मंत्री रोहिदास पाटील, शिवाजीराव मोघे, सुरेश शेट्टी, बाबा सिद्दीकी, दिलीपराव देशमुख, यांच्यासह २१ सदस्यांचा समावेश आहे.
राज्य आणि केंद्र सरकारने कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी उपाययोजना आखल्या आहेत. या उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यात येईल असे समितीचे समन्वयक मोहन जोशी यांनी सांगितले.
टास्क फोर्सच्या अंतर्गत विविध उपसमित्यांमध्ये सामाजिक व आर्थिक परिणाम उपसमिती, आरोग्य उपसमिती, शासकीय उपाययोजना अवलोकन उपसमिती आणि माध्यम, सोशल मिडिया व मदत कक्ष अशा उपसमित्या कार्यरत असतील.

