दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे मोदी सरकारचे आश्वासन फोल तेहसीन पुनावाला यांचा आरोप
पुणे : नोटाबंदीच्या नावाखाली लोकांना बचतीचा उपदेश देणारे भाजपाचे नेते अर्थमंत्री अरुण जेटलींच्या मुलीच्या लग्नात झालेली पैशाची उधळपट्टी विसरतात. नोटाबंदी आणि रोजगाराच्या प्रश्नांवर माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी विचारलेल्या प्रश्नांवर मोदींना उत्तर देता आले नाही. दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन या सरकारने दिले होते. तेही त्यांना पूर्ण करता आले नाही, असा आरोप युवा नेते तेहसीन पूनावाला यांनी केला.
पुणे शहर कॉंग्रेस कमिटी व दि मुस्लिम फाउंडेशन तर्फे नोकरी आपल्या दारी या भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, दि मुस्लिम फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड. हाजी गफूर पठाण, अल्पसंख्याक समितीचे नदीम मुजावर, नगरसेवक रईस सुंडके, हाझी फिरोज शेख, अनिस सुुंडके, निलोफर मुल्ला, परवीन हाझी फिरोज आदी यावेळी उपस्थित होते.
तेहसीन पुनावाला म्हणाले, केंद्रातील भा.ज.पा. सरकार देशाच्या प्रगतीच्या गप्पा मारत असताना आज कोंढव्यातील नागरिकांसोबत येथील बँका दुजाभाव करीत आहेत. मागील अडीच वर्षांपासून जनता दहशतीखाली जगत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
बाळासाहेब शिवरकर म्हणाले, काँग्रेसने तयार केलेले उद्योग भाजप सरकारने बुडविले. पुणे शहराच्या विकासासाठी नागरिकांनी काँग्रेसच्या मागे उभे रहावे. रमेश बागवे म्हणाले, मुस्लिम तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असून त्यामुळे नोकरी महोत्सवाचे आयोजन हा स्तुत्य उपक्रम आहे. दि मुस्लिम फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड. हाजी गफूर पठाण यांनी देखील यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कोंढवा आणि मिठानगर भागातील युवक, युवती आणि गृहिणींसाठी या नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.