पुणे-काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा सप्ताहाचे तेरावे वर्ष असून दिनांक 2 ते 9 डिसेंबर 2017 दरम्यान महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांचे मार्गदर्शन, काँग्रेस कनेक्ट अभियानाचा प्रारंभ, 125 वर्षे पूर्ण झालेल्या गणेशोत्सव मंडळांचा सन्मान, विद्यापीठे आणि विद्यमान सरकारची धोरणे, रेडिओचे सामाजिक प्रश्न सोडविण्यातील योगदान याबद्दल परिसंवाद, दिव्यांग मुलांसोबत आनंदोत्सव, चित्रकला स्पर्धा, सशस्त्र सुरक्षा दलाचा ध्वज दिन कार्यक्रम, तरुणांसाठी नोकरी मेळावा, जागर स्त्री शक्तीचा कार्यक्रमात बचत गटातील महिलांचा स्व. इंदिरा गांधी जन्मशताब्दी उद्योगिनी सन्मान यांसह विविध कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली.
सप्ताहाचे उद्घघाटन महाराष्ट्राचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या हस्ते शनिवारी (दि. 2 डिसेंबर) सायंकाळी 5 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सुशीलकुमार शिंदे असणार आहेत. सप्ताहातील विविध कार्यक्रमांमध्ये शहर कॉंग्रेस चे अध्यक्ष रमेश बागवे ,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उल्हास पवार, शरद रणपिसे, अनंत गाडगीळ यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर, जागतिक अपंग दिनानिमित्त कोरेगाव पार्क येथील अंधशाळेमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन रविवारी (दि. 3 डिसेंबर) दुपारी करण्यात आले आहे.
* काँग्रेस कनेक्ट अभियानाचा प्रारंभ –
काँग्रेस पक्षाने गेल्या 60 वर्षांच्या काळात व्यापक प्रमाणात युवकांपर्यंत पोहोचवून त्यांना पुन्हा काँग्रेसकडे वळविण्याकरिता काँग्रेस कनेक्ट हे अभियान राबविण्यात येणार असून त्याचा प्रारंभ पुण्यामध्ये होत आहे. या उपक्रमांतर्गत आयटी, बँका, सेवा, औद्योगिक क्षेत्र तसेच इतरही क्षेत्रात कार्यरत असलेल्या युवा पिढीला, सुशिक्षीत मध्यम वर्गीयांना काँग्रेसने देश उभारणीत दिलेल्या कार्याची माहिती देणे, काँग्रेसविषयीचे गैरसमज दूर करणे, त्यांच्याशी सतत संपर्कात राहून काँग्रेसविषयी अधिकाधिक माहिती देणे आदी अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. काँग्रेस कनेक्ट या अभियानाचा प्रारंभ (शनिवारी, दि. 2 डिसेंबर) सायंकाळी 5 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे उद्घाटन सोहळ्यादरम्यान अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
* विद्यार्थ्यांकरिता चित्रकला स्पर्धा :-
इयत्ता 1 ली ते 12 वीच्या विद्यार्थ्यांकरीता भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सारसबागेत ही स्पर्धा शनिवारी, (दि. 2 डिसेंबर) सकाळी होणार आहे. शिल्पकार विवेक खटावकर हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे आयोजित स्पर्धेत आत्तापर्यंत 1 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग निश्चित केला आहे. चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारी, (दि. 8 डिसेंबर) दुपारी घोले रस्त्यावरील राजा रवि वर्मा आर्ट गॅलरी येथे होईल.
* 125 वर्षे झालेल्या गणेशोत्सव मंडळांचा सन्मान :-
पुण्याच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक क्षेत्राचा कणा असलेल्या गणेशोत्सव मंडळांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाला 125 वर्षे पूर्ण होत असताना पुण्यातील अनेक मंडळांना देखील 125 वर्षे पूर्ण झाली आहेत. जगाच्या नकाशावर पुण्याच्या गणेशोत्सवाचे आणि गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचे वेगळे स्थान निर्माण झाले आहे. गणेश मंडळांनी सातत्याने 125 वर्षे समाजाच्या तळागाळात काम केले असून या कार्याबद्दल मंडळांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. सोमवारी (दि.4 डिसेंबर) सायंकाळी घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक सभागृह येथे कार्यक्रम होणार आहे. यावेळी डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलगुरु पी.डी.पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
* विद्यापीठे आणि विद्यमान सरकार – परिसंवाद :-
शिक्षणक्षेत्राच्या सध्याच्या परिस्थितीवर प्रकाश टाकणारा आगळावेगळा कार्यक्रम सप्ताहात आयोजित करण्यात आला आहे. नुकतेच मुंबई विद्यापीठामध्ये झालेला गोंधळ, शिक्षणमंत्र्यांसह इतर जबाबदार पदाधिका-यांची भूमिका या पार्श्वभूमीवर विद्यापीठे आणि विद्यमान सरकार – शैक्षणिक स्वायत्तता धोक्यात आणणारी निती याविषयावरील चर्चासत्राचे आयोजन मंगळवारी, (दि 5 डिसेंबर) सायंकाळी नवी पेठेतील पत्रकार भवन सभागृहात करण्यात आले आहे. यावेळी माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, प्रा.श्रीरंजन आवटे आदी उपस्थित राहणार आहेत.
* सामाजिक प्रश्नांमध्ये रेडिओचे योगदान – चर्चासत्र :-
विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल, टि.व्ही., इंटरनेटसारखी प्रसारमाध्यमे असताना देखील रेडिओचे सामाजिक प्रश्न सोडविण्यामध्ये मोठे योगदान आहे. त्यामुळे तरुणाईमध्ये रेडिओचा वापर मोठया प्रमाणात आजही होताना दिसतो. यंदा सप्ताहामध्ये याविषयी वेगळा कार्यक्रम होत असून रेडिओचे सामाजिक प्रश्न सोडविण्यातील योगदान याविषयावर बुधवारी (दि. 6 डिसेंबर) सायंकाळी स.प.महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉलमध्ये चर्चासत्र होणार आहे. यामध्ये विविध रेडिओ माध्यमांचे प्रतिनिधी सहभागी होणार असून असा कार्यक्रम पुण्यामध्ये प्रथमच होत आहे.
* सशस्त्र सुरक्षा दलाचा ध्वज दिन :-
सशस्त्र सुरक्षा दलाचा ध्वज दिन कार्यक्रम गुरुवारी (दि. 7 डिसेंबर) दुपारी अप्पा बळवंत चौकातील प्रभात थिएटरसमोर असलेल्या नूतन मराठी शाळेमध्ये होणार आहे. यावेळी 20 बाय 10 आकारातील भव्य रंगावली काढण्यात येणार असून शाळेतील 500 हून अधिक विद्यार्थी सेनाधिका-यांना मानवंदना देणार आहेत. कार्यक्रमाला लष्करातील सेनाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
* करिअर मार्गदर्शन शिबीर आणि नोकरी मेळावा :-
शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षणानंतर करिअरच्या वाटा शोधणा-या विद्यार्थ्यांकरीता दरवर्षीप्रमाणे यंदाही नोकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. लोहियानगरमधील सावित्रीबाई फुले सभागृह येथे गुरुवारी (दि. 7 डिसेंबर) सकाळी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यात पुणे आणि परिसरातील अनेक नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत.
* इंदिरा गांधी जन्मशताब्दी उद्योगिनी सन्मान सोहळा व समारोप :-
इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बचत गटांची चळवळ उभारुन अनेक महिलांना स्वत:च्या पायावर उभ्या करणा-या बचतगटांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी उस्मानाबाद येथील उद्योजिका कमल कुंभारे यांचा बचत गटातील कार्याबद्दल सन्मान होणार आहे. यावेळी विविध कंपन्यांचे मार्केटिंग प्रमुख देखील महिलांना मार्गदर्शन करणार आहेत. शनिवारी, (दि. 9 डिसेंबर) दुपारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा व समारोप समारंभ पार पडणार आहे.
याशिवाय अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सप्ताहामध्ये करण्यात आले आहे. सर्व कार्यक्रमांना मोफत प्रवेश असून नागरिकांनी यामध्ये मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

