पुणे ः संविधान सन्मान समितीच्यावतीने संविधान दिनाचे औचित्य साधून रविवारी (ता.26) काढण्यात येणाऱ्या भव्यदिव्य स्वरुपाच्या “संविधान सन्मान रॅली’ची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मार्गांची रचना, स्वच्छता, रॅलीत सहभागी होणाऱ्यांसाठी सोई-सुविधा, संविधान रथ, पार्कींगपासून ते रॅलीच्या कार्यक्रमाचे स्वरुप अशा सर्व कामांची माहिती घेऊन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पाहणी केली.अशी माहिती नगरसेवक अविनाश बागवे यांनी दिली .
संविधान दिनानिमित्त भव्यदिव्य स्वरुपाची संविधान रॅली व्हावी, यासाठी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरीकांनी एकत्रीत येऊन “संविधान सन्मान समिती’ या अराजकीय व्यासपीठाची निर्मिती केली. या समितीमार्फत मागील एक महिन्यापासून संविधान सन्मान समितीच्यावतीने “संविधान सन्मान रॅली’ची तयारी सुरू होती. शुक्रवारी या तयारीची पाहणी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. रमेश बागवे, महेंद्र कांबळे, बाळासाहेब जानराव, अशोक शिरोळे, रोहिदास गायकवाड आदी सदस्यांनी शुक्रवारी महात्मा फुले वाडा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासह संविधान सन्मान रॅलीच्या मार्गाची पाहणी केली. स्वच्छता, व्यासपीठाची रचना अशा विविध कामांची पाहणी करण्यात आली.
संविधान सन्मान रॅलीमध्ये जास्तीत जास्त नागरीकांनी सहभागी व्हावे, यासाठी समितीच्या सदस्य अनेक दिवसांपासून रचनात्मक पद्धतीने काम करत आहेत. बैठक, कोपरा सभा, घरोघरी भेटी देऊन या रॅलीमधील सहभाग वाढविण्यासाठी सदस्य प्रयत्नशील आहेत.
…अशी असेल संविधान सन्मान रॅली !
* रॅलीचे कार्यक्रमाचे स्वरुप ः रविवारी सकाळी दहा वाजता महापौर मुक्ता टिळक व लहान मुलांच्या हस्ते महात्मा फुले वाड्यातील सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येईल. संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन झाल्यानंतर रॅलीस प्रारंभ होईल. त्याप्रारंभी युवती-महिला, विद्यार्थी, पुरूष व अखेरीस कार्यकर्ते या पद्धतीने रॅलीमध्ये सहभागी होतील. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ.बाबासहेब आंबेडकर पुतळ्यासमोर रॅलीचा समारोप होईल.
* रॅलीचा मार्ग ः महात्मा फुले वाडा येथुन सकाळी दहा वाजता प्रारंभ. नेहरू रस्ता, रामोशी गेट पोलिस चौकी, ए.डी.कॅम्प चौक-संत कबीर चौक, जिल्हा परिषद इमारतीसमोरुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर समारोप.
* पार्कींगची सुविधा ः
दुचाकी वाहने – गंज पेठेतील सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन, रामोशी गेट येथील सावित्रीबाई फुले शाळा, मोहम्मद किडवई शाळा.
चारचाकी वाहने – डॉ.बाबासाहब आंबेडकर हायस्कुल (अहिल्याश्रम), क्वार्टर गेट, नाना पेठ.
——————-
संविधान सन्मान रॅलीची वैशिष्ट्ये
* प्रमुख आकर्षण “संविधान रथ’ ः देशातील सर्वसामान्य नागरीकाला संविधानामुळे बळ मिळाले. म्हणुनच स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय यांसारखी संविधानाची मुलतत्वांची माहिती या रथाद्वारे देण्यात येणार आहे. रथावर राष्ट्रचिन्ह असलेले सिंहाचे चित्र असेल. याबरोबरच संविधानाची उद्देशिकाही असेल. संविधान दिनाची वैशिष्ट्ये सांगणारी चित्रे या रथावर असतील. याबरोबरच तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्याकडे संविधान सुपुर्द करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची छायाचित्रांनी हा रथ सजविलेला असणार आहे. तर रथाच्या मध्यभागी तिरंगी ध्वज असेल.
* संविधान रॅलीसाठी नवकोरं गाणं ः “वुई द पिपल ऑफ डेमोक्रेटिक इंडिया’ या शब्दांनी सुरू होणारे नितांत सुंदर गीत खास संविधान सन्मान रॅलीसाठी तयार करण्यात आले आहे. उत्कृष्ट संगीत, गायन व शब्दरचना, अशा वैशिषाट्यांमुळे हे गाणे नागरीकांच्या मोबाईलमध्ये काही दिवसांपासुन वाजु लागले आहे. विशेषतः तरूणांना या गीताने अक्षरशः वेड लावले आहे.
* सर्वधर्मीय धर्मगुरुंचाही सहभाग ः संविधान सन्मान रॅलीमध्ये सर्व धर्मांच्या धर्मगुरूंनीही सहभागी व्हावे, यासाठी समितीने प्रयत्न केला आहे. त्यादृष्टीने शहरातील सर्व धर्मांच्या धर्मगुरूंना समितीने विशेष आमंत्रण दिले आहे. त्यामुळे या रॅलीमध्ये सर्वधर्मीय धर्मगुरूंचा महत्वपुर्ण सहभाग असणार आहे.
* शंभरहुन अधिक बैठका ः संविधान सन्मान रॅलीमध्ये शहरातील सर्व स्तरातील नागरीकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे, यासाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आत्तापर्यंत शंभरहून अधिक बैठका घेतल्या आहेत. त्यामध्ये शहरातील विविध वस्त्या, सोसायट्यांसह सर्व ठिकाणी बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकांना उपस्थिती लावुन नागरीकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. याबरोबरच प्रसिद्धीसाठी चाळीस हजार पॉम्पलेटचे वाटप करण्यात आले आहे. शंभरहून अधिक होर्डींग्जसवर जागृती करण्यात आली आहे.
* तीन हजार “मिस्ड कॉल’ ः रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या नागरीकांनी आपला सहभाग कळवावा, यासाठी समितीतर्फे 18001206235 हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला होता. या क्रमांकावर शुक्रवारी सायंकाळपर्यंत तीन हजार जणांनी मिस्ड कॉल दिला होता. त्यामुळे हजारो नागरीक या रॅलीमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.