पुणे- शहर जिल्हा काँग्रेस कमिटी च्या वतीने भारतरत्न स्व. इंदिराजी गांधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त काँग्रेस भवन येथे इंदिराजींच्या पुतळ्यास ज्येष्ठ पत्रकार सदा डुंबरे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून जन्मशताब्दी महोत्सव वर्षाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष रमेश बागवे होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर भाषणात शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले, “आदिवासी भाग असो, शहरी भाग असो वा ग्रामीण भाग असो लोक इंदिराजींना
अम्मा-माता म्हणून ओळखायचे. इंदिराजींनी ‘गरिबी हटाओ ‘ चा नारा देत सावकारांच्या विरोधात कायदा करून तो अमलात आणला. इंदिराजींच्या २० कलमी कार्यक्रमामुळे आणि बँकेच्या राष्ट्रीयीकरणामुळे देशात कष्टकरी गरीब जनतेला न्याय मिळाला आणि आपले दैनंदिन जीवन जगण्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध झाला. देशाची एकता व अखंडता टिकविण्यासाठी इंदिराजींनी आपले बलिदान दिले. स्व. इंदिरा गांधी हे असे व्यक्तिमत्त्व होते की जगातील सर्व नेते त्यांचा आदर करायचे. प्रियदर्शिनी ते आयर्न लेडी असा त्यांचा जीवनाचा प्रवास. आज आपण त्यांच्या जन्मशताब्दी महोत्सव वर्षाची सुरुवात करत आहोत. वर्षभर इंदिराजींच्या केलेले काम नव्या पिढीपर्यंत पोचविणे हीच खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली ठरेल.
यानंतर ज्येष्ठ पत्रकार सदा डुंबरे यांचा सत्कार शहराध्यक्षबागवे यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना
सदा डुंबरे म्हणाले, “इंदिराजींना देशातील जनतेचे प्रश्न माहीत होते. इंदिराजी देश चालवीत असताना समाजातील सर्व घटकांना विश्वासात घेऊन काम करायच्या. इंदिराजी या देशाच्या संस्कृतीचे व एकात्मतेचे प्रतीक होत्या. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. १९७१ च्या युद्धात पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगलादेश निर्मिती केली. ८० च्या दशकात पंजाब मध्ये शीख अतिरेकी स्वतंत्र खलिस्तानची मागणी करत होते आणि पंजाब मध्ये अतिरेकी कारवाई दिवसेंदिवस वाढत चालली होती. अमृतसर च्या सुवर्ण मंदिरात हे अतिरेकी हत्यारांसह लपले होते.
देशाला या अतिरेक्यांच्या कारवाईमुळे नुकसान होणार आहे हे लक्षात घेऊन इंदिराजींनी भारतीय सैन्याला सुवर्ण मंदिरात जाण्याचे आदेश दिला व अतिरेक्यांना नष्ट करण्यात भारतीय सैन्य यशस्वी ठरले . त्यांच्याकडून आजच्या पिढीला शिकण्यासारखं अनेक गोष्टी आहेत . समाजातील कष्टकरी जनता, कामगार, शेतकरी यांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी केलेली भरीव कामगिरी जनतेपर्यंत पोहचविणे ही त्यांना त्यांच्या जन्मशताब्दीदिनी आदरांजली ठरेल .”
यावेळी उपमहापौर मुकारी अण्णा अलगुडे, अ.भा.महिला काँग्रेसच्या सरचिटणीस सौ.कमल व्यवहारे, अभय छाजेड,अजित आपटे ,संगीत देवकर, युवक अध्यक्ष विकास लांडगे, अनिल सोंडकर, सदानंद शेट्टी,नगरसेवक मनीष आनंद, डॉ .सतिश देसाई, नुरुद्दीन सोमजी, मुख्तार शेख, रजनी त्रिभुवन, रमेश अय्यर, राजेंद्र पडवळ, रवी म्हसकर, अंजली निम्हण, नगरसेविका पूजा आनंद, मिलिंद काची, अनिस सुडके, लक्ष्मी घोडके, लता राजगुरू, सुरेश धर्मावत, जावेद निलगार, शानी नौशाद, नदीम मुजावर, राजेंद्र भुतडा, राज अंबिके, सोमेश्वर बालगुडे, जयकुमार ठोंबरे, सुनील घाडगे, मीरा शिंदे, सुलभा भोंडवे, सुजित यादव, वाल्मिकी जगताप, सुनील दैठणकर, राजेश पौडवाल, व पक्षाचे असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सरचिटणीसनिलेश बोराटे यांनी केले तर आभार उपाध्यक्ष अजित दरेकर यांनी मानले.