पुणे-नोटबंदीच्या काळात अनेक नागरिक मृत्युमुखी पडले, बँकांच्या बाहेर नोटा बदलण्यासाठी रांगा लागल्या, नोटबंदीनंतर केवळ दोनच महिन्यात 15 लाख लोक बेरोजगार झाले, शेतकरी-शेतमजूर हवालदिल झाले, अनेक उद्योगांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सरकारच्या या नोटबंदीचे दुष्परिणाम संपूर्ण देशातील जनता भोगत आहे. याच जनतेचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी 8 नोव्हेंबर रोजी देशभरात काँग्रेसतर्फे काळा दिवस पाळण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी दिली.
नोटबंदीनंतर देशभरात घडलेल्या विविध घडामोडीवर रेखाटलेल्या व संकलित केलेल्या व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन कै.बाळासाहेब ठाकरे कलादालनात त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ़ विश्वजीत कदम, महिला काँग्रेसच्या सरचिटणीस कमल व्यवहारे, माजी आमदार मोहन जोशी आदी उपस्थित होते.

