पुणे-पाठ्यपुस्तकात चुकीचा इतिहास लिहून काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्याची प्रतिमा मालिन करण्याचे षडयंत्र करण्यात येत आहे. त्यामुळे पाठय पुस्तकातील छपाईमध्ये दुरुस्ती करावी. अन्यथा तीव्र आंदोलन पुकारण्याचा इशारा काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांनी दिला आहे.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळातर्फे इयत्ता 9 वी च्या इतिहास व राज्यशास्त्र पुस्तकात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत राष्ट्रीय आणीबाणी घोषित केल्याचा उल्लेख केलेला आहे. त्याचप्रमाणे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कारकिर्दीत बोफोर्स तोफ खरेदी संदंर्भात झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात राजीव गांधीवर बरीच टिका झाली, असे लिहिलेले आहे. त्यास बोफोर्स तोफ खेरेदीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्व. राजीव गांधी हे निर्दोष आहे, असे जाहीर केले. असे असताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश पुस्तकात नमुद न करता मंडळ विद्यार्थ्यांची जाणून बुजून दिशाभूल करण्याचे काम करीत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा इतिहासाच्या पुस्तकात उल्लेख न करणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करण्यासारखे आहे.
तसेच पुस्तकामध्ये 1991 नंतरचे बदल या परिच्छेदामध्ये माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचा फोटो छापण्यात आलेला नाही. नरसिंह राव यांच्या कालावधीत देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये अनेक बदल घडून आले. याच परिच्छेदामध्ये आयोध्या येथील रामजन्मभूमीचा व बाबरी मशिदीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, असे लिहिले आहे. परंतु, बाबरी मशिद पाडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आणि मुख्य आरोपी म्हणून माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, माजी मंत्री मुरली मनोहर जोशी व मंत्री उमा भारती यांचा समावेश असून त्यांच्यावर लखनऊ कोर्टात खटला चालू आहे. याचा उल्लेख मंडळाने जाणूनबुजून या पुस्तकात केला नाही. तसेच डॉ. मनमोहन सिंग यांच्याही नावाचा या पुस्तकात कोठेही उल्लेख नाही.
दरम्यान, ‘आयसीएसई’ च्या इयत्ता 6 वीच्या पुस्तकामध्ये मशिदीस ध्वनीप्रदुषणाचे केंद्र म्हणून दर्शविण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये एका समाजाच्या विरूद्ध द्वेष पसरविण्याचे कार्य चालू आहे. लहान वयातच देशातील विद्यार्थ्यांच्या मनात विविध जाती धर्माच्या बाबतीत द्वेष निर्माण करून एक जातीय तणाव निर्माण करण्याचे काम शैक्षणिक मंडळ करीत आहेत. दोन्ही मंडळांनी ही चूक त्वरीत दुरूस्त करावी व झालेल्या चूकीच्या छपाईबाबत जाहीर माफी मागावी अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बागवे यांनी दिला.

