पुणे- रस्ते विकास, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्था, मलनी:सारण, आरोग्य, शिक्षण,
पार्किंग व्यवस्था, झोपडपट्टी विकास, निर्मळ मुळा-मुठा, सांस्कृतिक पुणे, सुरक्षित पुणे, आपत्ती व्यवस्थापन,
पर्यटन विकास, क्रीडा, महिला व जेष्ठ नागरिक, आठवडे बाजार, मजूर अड्डा, पर्यावरण संवर्धन, उत्पन्न वाढ,
वायफाय झोन असा २१ कलमी कार्यक्रम असलेला वचननामा पुणे शहर व जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने रविवारी
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सादर करण्यात आला.
कॉंग्रेस भवन येथे झालेल्या या वचननाम्याच्या प्रकाशनावेळी आमदार शरद रणपिसे, युवक कॉंग्रेसचे प्रदेश
अध्यक्ष डॉ. विश्वजित कदम, शहराध्यक्ष रमेश बागवे, उपमहापौर मुकारी अलगुडे, माजी मंत्री बाळासाहेब
शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, दीप्ती चवधरी, नगरसेवक आबा बागुल, अभय छाजेड, गोपाल तिवारी,
रशीद शेख आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, पुणे शहर सुसज्ज करणारा आणि सर्व घटकांना सामावून घेणारा हा
वचननामा आहे. पुणे शहराचा आत्तापर्यंतचा विकास हा कॉंग्रेस पक्षानेच केला आहे. पुणे शहराला देशातील
विकसनशील शहर बनविण्याचा कॉंग्रेसचा मानस असून त्यादृष्टीने या वचननाम्यात विचार करण्यात आला
आहे.
डॉ. विश्वजित कदम यांनी कॉंग्रेस पक्षाच्या या २१ कलमी वचननाम्याच्या जोरावर कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत
मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
रमेश बागवे म्हणाले, स्व. इंदिरा गांधींच्या २० कलमी कार्यक्रमाच्या धर्तीवर पुणे शहर व जिल्हा कॉंग्रेसने
महपालिकेच्या निवडणुकीसाठी २१ कलमी वचननामा सादर केला आहे.
एचसीएमटीआर हा ३४ किलोमीटर लांबीचा महत्वाकांशी प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करणार, शिवणे ते खराडी
हा नदीकाठचा रस्ता पूर्ण करून शहरातील वाहतुकीचा ताण कमी करणार, शहरातील मुख्य चौक किंवा रस्ते
ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होते त्याठिकाणी उड्डाणपूल बांधणार, पुणे शहराला
महापालिकेच्या स्वखर्चाने २४ तास पाणी पुरवठा करणार, पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या लाईनचे जाळे
१०० टक्के पूर्ण करणार, प्रत्येक प्रभागात कचरा प्रक्रिया प्रकल्प पूर्ण करणार,कचऱ्यापासून वीज, खत, विटा
तयार करणार, पुढील एका वर्षात १०० टक्के कचऱ्यावर प्रक्रिया करता येईल अशी सक्षम यंत्रणा उभारणार, ग्रे
वॉटर सिस्टीम प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात उभारणार, ग्रे वॉटरवर प्रक्रिया करून त्याचा वापर करून
महानगरपालिकेचे उत्पन्न वाढवणार, १०० टक्के सांडपाण्यावर रोज प्रक्रिया करणार, कॉंग्रेस पक्षाने सुरु केलेल्या
मेट्रोच्या कामाला गती देवून लवकर पूर्ण करणार,पीएमपीएमएल बसेसच्या संख्येत वाढ करणार, सायकल
स्टेशन आणि सायकल मार्ग यांची संख्या वाढवणार, पेठ भागातील महापालिकेच्या राखीव जागांवर बहुमजली
पार्किंग उभारणार, खाजगी जागांवर त्याचा मोबदला जागा मालकांना देवून यांत्रिक पार्किंग उभारणार, प्रत्येक
प्रभागात सार्वजनिक आरोग्य केंद्र (पीएचसी) उभारणार, फिरते दवाखाने सुरु करणार, रुग्णवाहिकांची संख्या
वाढवून अल्पदरात उपलब्ध करणार, आयुर्वेदिक उपचार देणार दवाखाना सुरु करणार , दंत चिकित्सालयाचे
युनिट सुरु करणार, प्रत्येक मनपा शाळेत ई-लर्निंग सुविधा उपलब्ध करणार,१० वी उत्तीर्ण झालेल्या मनपा
शाळेच्या विद्यार्थ्यांना टॅब देणार, मनपा शाळेतून १० वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना ५० टक्के सवलतीत
पीएमपीएल प्रवासपास देणार, फ्ल्यूएंट इंग्लिश स्पिकिंग क्लासेस सुरु करणार, एसआरए अंतर्गत ५०० चौरस
फुटांची घरे मिळावी यासाठी आग्रही भूमिका घेणार, झोपडपट्टीतील तरुणांना व तरुणींना कौशल्य विकास
कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण देणार व नोकरी महोत्सव आयोजित करणार, नदी सुधारणा योजनेंतर्गत मुळा-मुठा
नद्यांचे प्रदूषण कमी करणार, मुळा-मुठा नद्यांवरील घाटांचा पारंपारिक पद्धतीने जीर्णोद्धार करणार,
हिंगणेपासून खराडीपर्यंत नदीपात्र सुशोभित करणार, मनपा मध्ये नवीन सांस्कृतिक विभाग सुरु करणार,
लोकप्रसिद्धी मिळण्यासाठी ब्रँड अँम्बॅसीडर नियुक्ती करणार, , ओपन आर्ट गॅलरी उभारणार, सुरक्षित
पुण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावून संपूर्ण शहर सीसीटीव्ही कार्य क्षेत्राखाली आणणार,महिलांना आपत्कालीन
परिस्थितीत तातडीच्या मदतीसाठी विशेष हेल्पलाईन नंबर देणार, सीसीटीव्ही कॅमेरा जाळे पोलीस ठाण्यात व
वाहतूक विभागाला जोडणार, आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करणार, छोट्या अग्निशामक दलाच्या गाड्या
वाढवणार, पर्यटन विकास अंतर्गत शिवराज्याभिषेकाचे विशेष सादरीकरण करणार,अस्तित्वात असणारे
मत्स्यालयाचे आधुनिकीकरण करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे करणार, टूरिस्ट गाईड तयार करून त्यांना प्रशिक्षण
देवून पर्यटन वाढीसाठी त्यांचा उपयोग करणार, पुण्यातील जुन्या तालीम पुनर्जीवित करण्यासाठी विशेष निधी
देणार, खेळाडूंसाठी वसतीगृहाची उभारणी करणार, प्रत्येक प्रभागात क्रीडांगणाची व्यवस्था करणार,
शहरातील मोकळ्या जागेमध्ये महिला बचत गटांसाठी बाजार उपलब्ध करणार, मनपा अंतर्गत महिला व जेष्ठ
नागरिकांसाठी मोठ्या संख्येने शौचालये बांधणार, जेष्ठांसाठी आणीबाणीच्या काळत विशेष हेल्पलाईन नंबर
देणार, डे-केअर सेंटर उभारणार, आठवडे बाजाराकरिता जागा उपलब्ध करणार, फेरीवाले व स्टॉलधारक यांचे
सर्वेक्षण करून त्यांना जागा देणार, गरीब कष्टकरी मजुरांसाठी सोयी सुविधा असलेले मजूर अड्डे उभारणार,
पाणी, शौचालये व त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विशेष सोय करणार, टेकडीवर बांध तसेच
पाण्याच्या टाक्या बांधून वृक्षरोपणाचा कार्यक्रम हाती घेणार, नो व्हेईकल झोन महिन्यातून एकदा राबवणार,
रेन वॉटर हार्वेस्टिंगवर भर देणार, १०० टक्के थकबाकी वसूल करणार, मनापा इमारतींवर रूफ टॉप सोलर
पॅनेल व एलईडी लावून वीज वाचवणार, आणि पुणे शहरात मोफत वायफाय झोन सुरु करणार असा सर्व
घटकांचा विचार करून १०० टक्के कार्यपूर्तीचा आश्वासन देणारा हा वचननामा आहे.