पुणे : मी राज्यसभा सदस्य आणि शिवाय माजी मुख्यमंत्री असल्याने त्यामुळे माझा मोबाईल क्रमांक व इतर माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्यामुळे कोणाच्या डायरीत माझा मोबाईल क्रमांक लिहिलेला असेल तर मी दोषी कसा असेन. माझे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे चर्चा केली जाते. माझे त्यांच्याशी संबंध असतील तर मग मला अटक का केली जात नाही ? असा सवाल मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी उपस्थित केला आहे.
आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षीप्रमाणे शुक्रवारी पहाटे दिग्विजयसिंह यांनी पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मीनीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पुणे येथील काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा हिंसाचार पोलिस तपासामध्ये आपला मोबाईल क्रमांक मिळाल्याचा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना त्यांनी वरील स्पष्टीकरण देत “तर मग मला अटक का होत नाही” सवाल उपस्थित केला.
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, दिप्ती चवधरी, नगरसेवक रविंद्र धंगेकर, नगरसेविका सुजाता शेट्टी, प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड, माजी महापौर कमल व्यवहारे, सदानंद शेट्टी, सचिन तावरे आदी उपस्थित होते.

