पुणे- शहराचे माजी महापौर आणि माजी पर्यटन राज्यमंत्री काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत छाजेड (वय 67) यांचे आज (शुक्रवारी) सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचे निधन झाले.
चंद्रकांत छाजेड यांचा जन्म 1950 रोजी झाला. त्यांनी सुरुवातीपासून काँग्रेस पक्षात अनेक जबाबदा-या पार पाडल्या. त्यांनी बोपोडी येथून 1978 ते 2002 या दरम्यान नगरसेवकपद भूषवले. बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांचे ते नजीकचे सहकारी म्हणून ओळखले जात , त्यानंतर सुरेश कलमाडी यांच्यासमवेत त्यांनी पुण्याच्या विकासात योगदान दिले . याच नगरसेवकपदाच्या काळात 1987 ते 1988 या एक वर्षाच्या काळात पुणे शहराचे महापौर म्हणून देखील त्यांनी काम पाहिले. यानंतर त्यांनी 1992 ते 2002 पर्यंत महापालिकेमध्ये सभागृह नेते म्हणून काम पाहिले. तर 1999 ते 2009 मध्ये आमदार होते. तसेच मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्री मंडळात ते पर्यटनमंत्री होते.