तळजाई :वृक्षवल्लीचे रक्षण कि भक्षण ? -दोन ज्येष्ठ नगरसेवकांमध्ये संघर्ष
पुणे- पुण्याचा श्वास ,पुण्याची फुफुसे ,पुण्यातले मिनी महाबळेश्वर अशी ख्याती असलेल्या तळजाई टेकडीचे आणि तेथील निसर्गसंपदेचे रक्षण कि भक्षण ? या प्रश्नावरून कॉंग्रेस राष्ट्रवादीचे २ ज्येष्ठ नगरसेवक म्हणजे आबा बागुल आणि सुभाष जगताप यांच्यात संघर्ष निर्माण झाला असून , तळजाई टेकडीच्या आणि येथील वृक्षवल्ली च्या रक्षणार्थ जगताप यांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे तर येथील झाडांची कत्तल होते आहे हा अपप्रचार असल्याचा ठपका ठेवून जैववैविध्य पार्क च्या मंजूर प्रकल्पानुसार येथे काम होत असल्याचा दावा आबा बागुल यांच्याकडून केला जातो आहे. महापालिका आयुक्त यांनी या ठिकाणी पोलीस संरक्षणात जैववैविध्य पार्क चा घटक असलेले सोलर सिस्टीम चे शेड उभारावेत असे आदेश दिले आहेत .या सर्व प्रकारात तळजाई च्या जंगलाच्या अस्तित्वाशी निगडीत असा दोन ज्येष्ठ आणि बलशाली मानल्या जाणाऱ्या राजकारण्यांमध्ये संघर्ष निर्माण झाल्याचे दिसून येते आहे .
भवन रचना विभागाचे अधीक्षक अभियंता शिवाजी लंके यांनी आयुक्तांना लेखी पत्र देवून मिळविलेल्या आदेशानंतर हा वाद आता पराकोटीला पोहोचत असल्याची चिन्हे आहेत .
आबा बागुल यांनी तळजाई येथे जैववैविध्य पार्क मुख्य सभेत मंजूर करवून घेतले आणि त्याबाबतचे काम सुरु झाले .यामध्ये सुमारे अडीच एकराच्या भूखंडावर महापालिकेच्या लेखी पत्रानुसार (जे तळजाई येथे पोस्टर बनून झळकते आहे )सोलर सिस्टीम करिता शेड उभारण्याचा प्रस्ताव आहे .मात्र येथे केवळ सोलर साठी शेड होत नाही तर सोलर सह वाहनतळ देखील उभारले जाते आहे .सोलरसिस्टीम करता शेड उभारण्याचा प्रस्ताव तब्बल ९९ लाख ९६ हजार रुपयांचा असल्याचे या पत्रात म्हटले आहे आणि २० टक्के कमी दराने आलेले रोहित कंसट्रक्शन चे तेंद्र त्यासाठी मान्य करण्यात आलेलं आहे .प्रभाग क्रमांक ३५ ,सर्वे नंबर ६७ ते ७३ या ठिकाणी आबा बागुल यांच्या आग्रही मागणीनुसार हि टेंडर मागविण्यात आली आणि वर्क ऑर्डर देण्यात आली असे या पत्रात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे .मात्र संबधित ठेकेदाराने प्लेन टेबल सर्वे चे काम सुरु केले तेव्हा काही अज्ञात लोकांनी यास अडथला आणला त्यामुळे १९ डिसेंबर २०१८ रोजी ठेकेदाराने महापालिकेला आणि पोलिसांना सुरक्षा पुरवा असे सांगितले .त्यानंतर पुन्हा काम सुरु केले ,आणि अडथळा ठरणाऱ्या वृक्षांचा सर्वे सुरु केला तेव्हा , याच प्रभागातील स्वीकृत सदस्य जगताप आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मनाई करून काम थांबविले .त्यानंतर सुभाष जगताप यांना भेटून या संदर्भात चर्चा केली असता त्यांनी या कामास विरोध केला आणि काम करू नये असे सांगितले .एकीकडे जगताप यांचा विरोध आणि दुसरीकडे आबा बागुल यांच्या कडून काम पूर्ण करवून घेण्यासाठी वारंवार होणारी विचारणा …अशा परिस्थितीत काय करावे हे आपणच सांगा असे पत्र भवन विभागच्या शिवाजी लंके यांनी आयुक्तांना दिले . ज्यावर पोलीसबंदोबस्त घेवून काम करावे असा आदेश अतिरिक्त आयुक्त रुबल आगरवाल यांनी दिले. यावर आयुक्त सौरव राव यांनी देखील सही केली आहे .
आज हे पत्र तळजाई येथे पोस्टर च्या स्वरूपात झळकले आणि वृक्ष प्रेमींच्या सह्यांची मोहीम सुरु करण्यात आली .
या सर्व प्रकरणात येथील झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल करणे झाडांना आगी लावणे अशा घटना येथे होत असल्याचा आरोप एकीकडून होतो आहे तर दुसरीकडून आबा बागुल यांनी हा अपप्रचार आहे असे सांगितले आहे .तळजाई टेकडी वर ३०० हुन अधिक देशी झाडांची कत्तल करण्याचा घाट पुणे महानगपालिका प्रशासन व स्थानिक नगरसेवक घालत आहेत. त्यासाठी आज हा घाट हाणून पाडण्यासाठी सकाळी ६ वाजल्या पासून सही मोहीम राबविली आहे. 2000 हुन अधिक नागरिकांनी या स्वाक्षरी मोहिमे मध्ये सहभाग घेतला.प्रशासन व स्थानिक नगरसेवकांनी वेळेत निर्णय बदलावा. निसर्ग व पर्यावरणाची हानी रोखावी.असे आवाहन सुभाष जगताप यांनी केले आहे .आज सोशल मिडिया च्या माध्यमातूनही त्यांनी या प्रकरणी जागृती करण्याचा प्रयत्न केला .
तर ज्या जागेत सोलर रूफ पार्किंग होणार आहे. तिथे केवळ ६६ वृक्ष आहेत आणि त्यांचे पुनर्रोपण नियमानुसारच होणार आहे , विघ्नसंतोषी लोकांनी वृक्षांची कत्तल होणार असल्याचा केलेला आरोपच निराधार आहे. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि व्यक्तिगत स्वार्थासाठी निवासीकरणाला चालना देऊन तळजाईचे अस्तित्व नष्ट करण्यासाठीच विघ्नसंतोषी लोकांनी हे रचलेले षडयंत्र आहे. असा आरोप आबा बागुल यांनी केला आहे .
तळजाई टेकडी वन्यजीव अधिवासासह पर्यावरणाचे संवर्धन व्हावे यासाठी माझ्या संकल्पनेतून आणि पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून जैववैविध्य उद्यानाचा महत्वपूर्ण प्रकल्प नियमानुसार होत आ, असा दावाही त्यांनी केला आहे.