पुणे – हिंदी व मराठी सुमधुर चित्रपट गीतांच्या आस्वाद घेत सहकारनगर परिसरातील तुळशीबागवाले कॉलनी मैदानावर सुमारे अडीच हजार रसिक प्रेक्षकांनी रविवारी सायंकाळी ‘सांस्कृतिक दिवाळी’चा आनंद लुटला. आधार सेवा केंद्राचे अध्यक्ष हेमंत बागुल यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात प्रख्यात पार्श्वगायक जितेंद्र भुरुक व सहकार्यांनी हिंदी व मराठी गीतांची अविट मैफल सादर केली. या वेळी अनेक गाण्यांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे ‘वन्स मोअर’ही दिला.
या वेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे मनपा काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल आवर्जून उपस्थित होते. ‘सहकारनगरमधील या सांस्कृतिक कार्यक्रमास सहभागी होता आले याचा आनंद झाला असून, गेले सुमारे 20 महिने करोनामुळे आलेली बंधने आता परिस्थिती सुधारल्यामुळे दूर होत आहेत. त्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने असा आनंद घेत आहेत याचे समाधान वाटते’, असे ते म्हणाले.
याप्रसंगी पुणे मनपा काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल म्हणाले की, ‘संगीत हा सगळ्यांना एकत्र गुंफणारा धागा आहे. तसेच सध्याच्या मानसिक तणावाच्या काळात संगीतामुळेच मनाला आनंद मिळतो. या कार्यक्रास अडीच हजारांहून अधिक नागरिक उपस्थित राहिले यावरून अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची किती मोठी गरज आहे याची प्रचिती येते’ असे ते म्हणाले.

याप्रसंगी प्रास्ताविक करताना हेमंत बागुल यांनी पार्श्वगायक जितेंद्र भुरुक यांचे कौतुक करून गाण्यांचे पाच हजारांहून अधिक कार्यक्रम जितेंद्र भुरुक यांनी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच असे कार्यक्रम आयोजित करून सुमारे 65 लाख रुपये त्यांनी विविध सामाजिक संस्थांना मिळवून दिले याबद्दलही त्यांनी जितेंद्र भुरुक यांचे कौतुक केले.
याप्रसंगी पुण्याचे वैभव असणारे व सहकारनगर परिसराचे रहिवासी ज्येष्ठ व्हायोलिनवादक कै. प्रभाकर जोग यांना व्हायोलिनची धुन वाजवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांचे नातू गायक अमेय जोग हे याप्रसंगी उपस्थित होते. तसेच प्रख्यात गायक राजेंद्र बर्वे व त्यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.
पार्श्वगायक जितेंद्र भुरुक यांना शैलेश देशपांडे (व्हायोलिन), रशिद शेख (की-बोर्ड), मुकेश देढिया (गिटार), विजय मूर्ती (बेस गिटार), अनिल करमरकर (सॅक्सोफोन), अभिषेक भुरुक (ड्रम), आनंद घोगरे (मशिन), दिनेश पांडे (साइड रिदम), किरण एकबोटे (ढोलक), रोहित साने (तबला) यांनी साथ दिली. जितेंद्र भुरुक यांच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्ना दहिवेलकर यांनी केले. गायनाला साथ राजेश्वरी पवार, अश्विनी गुरपे आणि साउंड गौतमचे बाळा पवार यांनी केली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन संजय पोमण यांनी केले. आभार प्रदर्शन घनश्याम सावंत यांनी केले. सर्व रसिकांसाठी चहा व पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. याप्रसंगी सौ. जयश्री बागुल, नंदकुमार बानगुडे, घनश्याम सावंत, नंदकुमार कोंढाळकर, रमेश भंडारी, श्री. विलास रत्नपारखे, अॅड. चंद्रशेखर पिंगळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
फोटो ओळ 1 – सहकारनगरच्या तुळशीबागवाले कॉलनीच्या मैदानावर आधार सेवा केंद्राचे अध्यक्ष हेमंत बागुल यांनी ‘सांस्कृतिक दिवाळी’ आयोजित केली. त्यामध्ये पार्श्वगायक जितेंद्र भुरुक व सहकार्यांनी अविट हिंदी मराठी गाणी सादर केली. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या वेळी मनपा काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल, संयोजक हेमंत बागुल, जितेंद्र भुरुक, राजेंद्र बर्वे, श्री. पवार इत्यादी.

