पुणे- किरीट सोमय्यांनी पुण्यातील जम्बो कोविड सेंटरबाबत केलेल्या आरोपांविषयी अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली आहे. “पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोविड सेंटर्सच्या व्यवस्थेमध्ये सुरुवातीपासून पारदर्शकता ठेवली आहे. कुठेही चूक होणार नाही अशा सूचना दिल्या आहेत. जर कुणाचं तसं म्हणणं असेल त्यांच्याविरुद्ध पुरावे द्या, त्यावर चौकशी करून दोषींवर कारवाई करू,निव्वळ आरोप कोणी करू नये ”, असं ते म्हणाले.आपल्याला या आरोप-प्रत्यारोपांमध्ये रस नसल्याचं अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलं. “पुरावे देऊन हे आरोप सिद्ध झाले तर त्याबद्दलची कारवाई होईल. पण हल्ली मी बघतो की खूप काही आरोप केले जातात. ते कुठल्या स्तरावर जातायत, कशी माफी मागितली जाते, दिलगिरी व्यक्त केली जाते हे तुम्ही पाहाता. मी नेहमी सांगतो की मला या कुठल्याही गोष्टीमध्ये रस नाही. मला कामात रस आहे. आम्ही आपल्यावर जी जबाबदारी सोपवली आहे, ती पार पाडण्याचं काम करतोय”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
(जम्बो हॉस्पिटल बाबत महापौर आणि महापालिका आयुक्त यांना आपण तक्रार देण्यास सांगितले आहे असे पीएमआरडीए ला भेट दिली तेव्हा किरीट सोमैय्या यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट सांगितले होते . मात्र या दोहोंनी याबाबत कोणत्याही प्रधीकृत ठिकाणी तोंडी देखील तक्रार केलेली नाही )
“आपल्याकडचे लोक कष्टाची कामं करण्यास तयार होत नाहीत”, उपमुख्यमंत्री
पुण्यातील येरवड्यामध्ये शास्त्रीनगर भागात घडलेल्या दुर्घटनेमध्ये ५ बांधकाम कामगारांचा मृत्यू झाल्याचा प्रकार गुरुवारी समोर आला. या इमारतीचं बांधकाम सुरू असून त्यावेळीच स्लॅबची जाळी कोसळून ही दुर्घटना घडल्याचंही स्पष्ट झालं. या संदर्भात आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी बोलताना त्यांनी हे सर्व मजूर बिहारचे असून आपल्याकडी लोकं अशी कष्टाची कामं करायला तयार होत नसल्याबद्दल नाराजी देखील व्यक्त केली.“येरवडा दुर्घटनेत मरण पावलेले मजूर हे बिहार मधील होते. सुनिल टिंगरेंनी लक्षात आणून दिलं की या ठिकाणी ते काम तातडीने करून द्यायचं असल्यामुळे बिहारची ही टीम दिवसरात्र काम करत होती. त्यांना इथे येऊन ८ दिवसही झाले नव्हते. या मजूरांना कंत्राटावर घेण्यात आलं नव्हतं”, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.“आपल्या भागातली लोकं अशा प्रकारचं कष्टाचं काम करण्यासाठी इतके तयार होत नाहीत, जेवढे मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागातली लोकं तयार होतात”, असं अजित पवारांनी यावेळी बोलताना सांगितलं.पुण्यातील येरवड्यामधील शास्त्रीनगर परिसरात वाडिया बंगल्याजवळ इमारतीच्या स्लॅबची जाळी कोसळून सहा कामागारांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली.

