पुणे, दि. ०९ मार्च २०२२: कौटुंबिक जबाबदाऱ्यांसह विद्युत क्षेत्रातील आव्हानात्मक जबाबदाऱ्या समर्थपणे पेलणाऱ्या व कंपनीला प्रगतिपथवर नेणाऱ्या सक्षम महिला अधिकारी, अभियंता व कर्मचारी महावितरणसाठी अभिमानास्पद आहेत असे गौरवोद्गार महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे यांनी मंगळवारी (दि.८) काढले.
येथील ‘प्रकाशभवन’मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अधीक्षक अभियंता सौ. पुनम रोकडे, श्री. सतीश राजदीप, उपमहाव्यवस्थापक श्री. अजय खोडके (आयटी) व श्री. अभय चौधरी (मानव संसाधन) उपस्थित होते. प्रादेशिक संचालक श्री. नाळे म्हणाले की, भारतात प्रथमच विद्युत क्षेत्रात महावितरणमध्ये महिला तंत्रज्ञांची (लाईनवूमन) भरती करण्यात आली. हा निर्णय अतिशय योग्य व सार्थ असल्याचा प्रत्यय महावितरणच्या महिला तंत्रज्ञांनी केलेल्या कामगिरीमुळे आला आहे. त्यांच्यासह महिला अभियंता व अधिकारी देखील महावितरणमधील विविध पदांच्या जबाबदाऱ्या समर्थपणे पूर्ण करीत आहेत. महावितरणची ही सक्षम महिलाशक्तीची वाटचाल अभिमानास्पद आहे असे श्री. नाळे यांनी सांगितले.
यावेळी अधीक्षक अभियंता सौ. पुनम रोकडे व श्री. सतीश राजदीप यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला सहायक महाव्यवस्थापक सौ. दिप्ती आंबेकर, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. शिरीष काटकर, कार्यकारी अभियंता श्री. संजीव राठोड, तसेच महिला अभियंता, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. सुत्रसंचालन उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पटनी यांनी केले व आभार मानले.

