पुणे : संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला विविध हक्क दिले आहेत. या हक्क आणि अधिकारची माहिती होण्यासाठी संविधान जनजागृती झाली पाहिजे. यासाठी सामुदायिक प्रयत्न करणे आवश्यक आहेत असे मत माजी सनदी अधिकारी ई.झेड.खोब्रागडे यांनी व्यक्त केले.
भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांच्या जनसंपर्क कार्यालयात ‘भारतीय संविधान’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
खोब्रागडे म्हणाले, मी सनदी अधिकारी म्हणून काम करत असताना माझ्या लक्षात आले माझ्या सोबत काम करणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांना कायदा माहित होता, योजना माहित होत्या मात्र हे सर्व ज्या संविधानामध्ये आहे त्या संविधाना विषयी त्यांना विशेष माहिती नव्हती. दररोज सर्वसामान्य जनतेची कामे करत असताना प्रशासकीय कामाचा सबंध येणाऱ्या अधिकाऱ्यांना जर संविधाना विषयी जर फार माहिती नसेल तर सर्वसामान्य लोकांना संविधानाविषयी माहिती कोठून असणार ? असा विचार करून मी नागपूर जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत असताना २००५ साली मी याबाबत जनजागृती करण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व शाळेतून घडत असल्याने त्यांना शालेय स्तरावरून संविधान संस्कार देण्याचा निश्चय मी केला. त्या दृष्टीने निर्णय घेऊन माझ्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या सर्व पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना तसेच केंद्र प्रमुखांना बोलवून आपापल्या भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत संविधान प्रास्तविका शाळेतील दर्शनी भागात भिंतीवर लावण्याच्या सूचना दिल्या. नागपूरच्या जिल्हा परिषद शाळेत सुरु झालेला हा उपक्रम हळूहळू महाराष्ट्रातील सर्व शासकीय तसेच खासगी शाळेत पोहचला. विद्यार्थ्यांनी हे वाचावे तसेच याविषयी पालकांशी चर्चा करावी पालकांनी या विषयी अधिक माहिती घ्यावी हा या मागील उद्देश होता.
भारतीय संविधानाविषयी बोलताना ते म्हणाले, संविधानाच्या पहिल्या भागात आम्हाला देश घडवायचा आहे हे नमूद केले आहे. दुसऱ्या भागातून सर्वसामान्य नागरिकांना न्याय,समता आणि बंधुता अर्पण केली आहे. शेवटच्या भागात हे संविधान भारताच्या लोकांनी,लोकांसाठी लोकांना अर्पण केले आहे. घटनेनुसार देशाचा सर्वसामान्य व्यक्ती सर्वोच्च आहे. दुर्दैवाने याची माहिती मात्र सर्वसामान्यांना नाही. यासाठी सरकारसह सामाजिक संघटनांनी तसेच प्रभावशाली व्यक्तींनी प्रयत्न करून संविधान जागृतता करणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही संविधान साहित्य संमेलन, संविधान प्रास्तविकाचे सामुदायिक वाचन, संविधान काव्य संमेलन यासारखे उपक्रम आम्ही करत आहोत. याचप्रमाणे प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न करावे लागतील.ज्या दिवशी संविधानाचा अर्थ देशातील प्रत्येक नागरिकाला समजेल त्या दिवशीपासून भारत खऱ्या अर्थाने प्रगत देश म्हणून ओळखला जाईल.
देशात संविधान दिन साजरा होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. यासाठी सरकारकडे सातत्याने आम्ही पत्रव्यवहार करत होतो. आमच्या पत्राची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ पासून सरकारच्या प्रत्येक विभागात संविधान दिन साजरा करण्याच्या सूचना दिल्या. गेल्या वर्षी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात राष्ट्रपतींनी सरनाम्याचे वाचन केले. हे देशात पहिल्यांदा घडले. कॉंग्रेसच्या काळात हे होणे अपेक्षित होते.मात्र दुर्दैवाने कॉंग्रेसने या विषयी लक्ष दिले नाही अशी खंत खोब्रागडे यांनी यावेळी व्यक्त केली.

