पुणे, ता. १० – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसी)’बीकॉम फिनटेक’ (फायनान्शिअल टेक्निकल) हा माहिती-तंत्रज्ञानासह वाणिज्य-व्यवस्थापन पदवी अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करणार असल्याची माहिती बीएमसीसीच्या प्राचार्या डॉ. सीमा पुरोहित यांनी कळविली आहे.
पुरोहित म्हणाल्या, ‘बाजारपेठेच्या बदलत्या गरजा लक्षात घेता वाणिज्य, व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा एकत्रित विचार करून हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. त्यानुसार या अभ्यासक्रमात व्यवस्थापन आणि अकौंटिंगचे मूलभूत विषयांसह डेटा अनॅलिसिस, फायनान्शिअल क्वान्टेटिटिव्ह अप्टिट्यूट, फायनान्शिअल मोडेलिंग, बिग डेटा अनॅलिसिस, अॅडव्हान्स बॅकिंग सर्व्हिसेस, सायबर सिक्युरिटी आदी तंत्रज्ञानावर आधारित कौशल्याधारित विषयांचा समावेश आहे.
प्रवेशासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाची बारावीची परीक्षा गणित या विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. हा अभ्यासक्रम १६० क्रेडिट गुणांचा असणार आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठाची पदवी दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी https://www.bmcc.ac.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

