पालकमंत्र्यांकडे तक्रार करणार – नितीन कदम
पुणे- मध्यवर्ती पुण्यातील सर्व पेठांना व सिंहगड रोडला पाणीपुरवठा करणाऱ्या पर्वती जलकेंद्र येथील LLR टाकीचा ६० बाय २० फुटाचा स्लॅब रात्री कोसळला.याबाबत महापालिका प्रशासनाला कल्पना देऊनही प्रशासनाने दक्षता न घेतल्याने हा प्रकार घडला त्यामुळे याबाबत पालकमंत्री यांच्याकडे आपण तक्रार करणार आहोत अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नितीन कदम यांनी येथे दिली .
ते म्हणाले,’ 35 दशलक्ष लिटर क्षमतेची ही टाकी असून भोवतीने जनता वसाहत सारखी दाट लोकवस्तीचा भाग आहे. स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका प्रिया गदादे यांनी पुणे मनपाला अनेक वेळा लेखी पत्राद्वारे सदरची बाब निदर्शनास आणली होती. परंतु भाजपची सत्ता असलेल्या ढिम्म प्रशासनाने याबाबत कोणतीच कारवाई केली नाही.स्मार्ट सिटीची खोटी स्वप्ने दाखवून आठ आमदार आणि शंभर नगरसेवक पुणेकरांनी निवडून देऊन मोठ्या विश्वासाने यांच्या हाती सत्ता सोपवली होती. पाणीपुरवठा सारख्या मूलभूत सुविधा नागरिकांना अपेक्षित असताना गेले चार वर्षे पुणेकरांच्या मिळकतकर रूपी पैशांची उधळपट्टी करीत या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आले.
पुणे महानगरपालिकेच्या या भोंगळ कारभाराने स्मार्ट सिटी चा फज्जा उडालेला आहे.
परंतु राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी या बाबत ठाम भूमिका घेऊन सदरची बाब पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या निदर्शनास आणून मार्गी लावणार आहे.याप्रसंगी नितीन कदम, शिवाजी भाऊ गदादे पाटील, निलेश पवार, प्रदीप शिवशरण, अमोल ननावरे, फारुक शेख, शुभम मोहोळ, नारायण तेलंग इत्यादी पर्वती-राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

