पुणे :
भारतीय संगीताच्या दुनियेची स्वरसम्राज्ञी असणाऱ्या भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जीवन प्रवासावर दिलीपकुमार ,हरिप्रसाद चौरासिया ,बाबासाहेब पुरंदरे ,माधुरी दीक्षित ,राज ठाकरे अशा विविध क्षेत्रातील ३८ दिग्गजांचे लेख असलेले कॉफी टेबल बुक तयार करून लता दिदींनाच भेट देण्याचा अनोखा उपक्रम पुण्याच्या तरुणाने केला आहे !
लता दीदींचा फॅन असलेल्या रिदम वाघोलीकर या पुण्यातील युवकाने ‘स्वरलता ‘ हे कॉफी टेबल बुक तयार केले असून अविनाश गवई (संचालक ,मीडिया ४यू ) यांनी प्रकाशित केले आहे . रचना शाह यांनी संपादनात मदत केली आहे .
६ एप्रिल च्या सायंकाळी लतादीदी आणि मीना खडीकर यांच्या हस्ते ‘ प्रभू कुंज ‘ या मंगेशकरांच्या मुंबई निवासस्थानीच हा प्रकाशनसोहळा रंगला .
या कॉफी टेबल बुकचा आकार ‘ग्रामोफोन तबकडी सारखा आगळावेगळा असून ९६ पानातुन लता दीदींच्या कारकिर्दीचा मागोवा घेण्यात आला आहे . दिलीपकुमार ,हरिप्रसाद चौरासिया ,पंडित जसराज ,बिरजूमहाराज ,बाबासाहेब पुरंदरे ,माधुरी दीक्षित ,नितीन गडकरी ,राज ठाकरे ,मीना खडीकर, जब्बार पटेल ,सुदेश भोसले ,रेखा अशा ३८ दिग्गजांनी लेखन योगदान दिले आहे .
‘लहानपणापासून पाहिलेले स्वप्न आज पुस्तकाच्या रूपाने पूर्ण होत आहे . हे कॉफी टेबल बुक म्हणजे लतादीदींना एका फॅन कडून भेट आहे , हा ठेवा मौल्यवान असला तरी विक्रीसाठी नाही ‘,अशा शब्दात रिदम वाघोलीकर यांनी भावना व्यक्त केल्या . दस्तुरखुद्द दीदींनी या संग्राह्य कॉफी टेबल बुक च्या ५ प्रतींवर सह्या केल्या . आणि वाघोलीकर यांना आशीर्वादपर संदेश लिहिला . ‘ मी भारावून गेले आहे आणि फार फार आभारी आहे ‘ असे त्यांनी या संदेशात लिहिले आहे .
या वेळी रिदम वाघोलीकर यांचे कुटुंबीय सुधीर वाघोलीकर,अनुराधा वाघोलीकर ,आशय वाघोलीकर तसेच अविनाश गवई ,रचना शाह उपस्थित होते .

