मुंबई-मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री विकासकामांसाठी पैसे देत नाहीत. आता मी तरी काय करू, अशा शब्दांत राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी आपली हतबलता बोलून दाखवली आहे. शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याशी बोलताना त्यांनी आपली व्यथा मांडली. त्यांच्या या संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला.
भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्याची ही गेल्या काही दिवसांतील तिसरी घटना आहे. ‘पक्षाचे राज्यात दीड कोटी सदस्य असले तरी प्रामाणिक कार्यकर्ते दुर्बीण घेऊन शोधावे लागत आहेत,’ या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर बाजू सावरताना भाजपची अवघड स्थिती झाली असतानाच ‘वर्षभरात सरकार बदलणार आहे’ या अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्या विधानाने भाजपची पंचाईत झाली आहे. या वादग्रस्त विधानांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही मंत्र्यांजवळ नाराजी व्यक्त केल्याचे समजते.
शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कन्नड तालुक्यातील चार गावांच्या पाणीपुरवठा योजनांना निधी मिळण्याच्या मागणीसाठी गुरुवारी औरंगाबाद येथील चिकलठाणा विमानतळावर लोणीकर यांना घेराव घातला. तालुक्यातील पाणीपुरवठा योजना चार वर्षापासून रखडल्या आहेत. कामे कधी सुरू करणार, अशी विचारणा केली. त्यावर कर्जमाफीमुळे कामे होण्यास उशीर होत आहे, अशी बतावणी लोणीकर यांनी केली. मात्र, चार वर्षांपासून कर्जमाफी सुरू आहे काय? असा प्रतिप्रश्न लोणीकर यांना करण्यात आला. त्यावेळी लोणीकर यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री पैसे देत नाहीत. विधानसभा अध्यक्षांच्या मतदारसंघातील कामंही झालेली नाहीत. मग मी तरी काय करू शकतो?, असे लोणीकर यांनी म्हटले.