मुंबई-
‘सेव्ह आयएनएस विक्रांत’ अभियानात झालेल्या कथित भ्रष्टाचारप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील यांना मुंबई पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने एस्प्लेनेड कोर्टात (किल्ला कोर्ट) क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे.
माजी सैनिकाचा आरोप
माजी सैनिक बबन भीमराव भोसले (वय ५३) यांच्या तक्रारीवरून ट्रॉम्बे पोलिसांनी एप्रिलमध्ये सोमय्या आणि त्यांच्या मुलाविरुद्ध FIR दाखल केला होता. भोसले यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले होते की, त्यांनी 2013 साली आयएनएस विक्रांत ही युद्धनौका वाचवण्यासाठी दोन हजार रुपये दिले. ‘सेव्ह आयएनएस विक्रांत’ मोहिमेद्वारे भाजपचे ज्येष्ठ नेते सोमय्या यांनी 57 हजार कोटींचा घोटाळा केला. शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनीही या प्रकाराचा आरोप केला आहे.
पोलिसांचे काय म्हणणे आहे?
पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, आम्ही आयएनएस विक्रांत प्रकरणाची चौकशी केली. त्यात कोणताही गुन्हा आढळून आला नाही. कोणाचीही फसवणूक करण्याचा सोमय्या यांचा हेतू नव्हता. म्हणूनच तपासात त्यांच्या हेतू आणि कृतीत कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी आढळली नाही. दरम्यान, या प्रकरणी किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकेसंदर्भात अंतरिम संरक्षण मिळाले आहे.

