२४ तास पाणीपुरवठा योजना पूर्ण कधी होणार ? आयुक्त म्हणाले फेब्रुवारी २३ पर्यंत पूर्ण करतो .
मृत जनावरांच्या विल्हेवाटीवरून एकमेकांकडे बोटे दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांनाही सुनावले
पुणे – महापालिका बरखास्त झालेली असली तरी नागरिक बरखास्त झालेले नाहीत.शहरातील पाणी प्रश्नावर त्यांना दिलासा देणे ही आपली जबाबदारी आहे. उन्हाळ्यापूर्वी २४ तास पाणीपुरवठा या योजनेचे काम पूर्ण होणे अपेक्षीत होते ते का झाले नाही ?मृत जनावरांची विल्हेवाट लावायला महापालिकेकडे जागा नाही काय ? कचरा पेटीतील दुर्गंधी किती सहन करायची ? आणि खोटी उत्तरे तर अजिबात द्यायची नाहीत असे सांगत एकमेकांवर ढकला ढकली करणाऱ्या अधिकाऱ्यांना सामोरा समोर बोलावून घेत खासदार गिरीश बापटांनी खरे खोटे याचा सोक्षमोक्ष लावण्याचे हत्यार उचलल्याने प्रशासनाचा ढिल्ला कारभार चव्हाट्यावर आला आणि त्यामुळे नगरसेवकांची मुदत संपलेली असली तरी समान पाणी पुरवठा योजनेचे काम आपल्या भागात वेगात करून घ्यावे असे आवाहन करणारे पत्र खासदार गिरीश बापट यांनी सर्व माजी झालेल्या नगरसेवकांना पाठविले . एक प्रकारे तुम्ही माजी झालात तरी प्रशासनाच्या राजकारणाला बळी न पडता लोकांची कामे सुरु ठेवा, लोकांच्या प्रश्ना साठी समस्या सोडविण्यासाठी जागरूक राहा मी हि तुमच्यासाठी उपलब्ध आहे असा संदेश खासदार गिरीश बापट यांनी काल महापालिकेत जाऊन दिला २४ तास पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी खासदार गिरीश बापट यांनी आज महापालिका आयुक्त आणि प्रशासक विक्रम कुमार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली . पुष्कर तुळजापूरकर, संजय मयेकर यावेळी उपस्थित होते.

बापट म्हणाले, महापालिका बरखास्त झालेली असली तरी नागरिक बरखास्त झालेले नाहीत.शहरातील पाणी प्रश्नावर त्यांना दिलासा देणे ही आपली जबाबदारी आहे. महापालिका आयुक्त आणि प्रशासक विक्रम कुमार यांनी फेब्रुवर २३ पर्यंत हि योजना पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. ‘समान पाणीपुरवठा योजनेचे ५५ टक्के काम पूर्ण झाले आहे. एकूण ८२ पैकी ३९ टाक्यांचे काम पूर्ण झाले, तर ३४ टाक्यांचे काम सुरू आहे. ९ ठिकाणी वन विभाग, संरक्षण किंवा कायदेशीर कारणांनी काम सुरू होऊ शकलेले नाही. १ हजार ३४५ किलोमीटर पैकी ६७४ किलोमीटर जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झालेले आहे. तर ५७ हजार ९४० जलमापक बसविण्यात आले आहेत. ही योजना पूर्ण झाल्यानंतर पुणेकरांना शुद्ध, पुरेसे पाणी मिळेल व वर्षाला ३ टीएमसी पाण्याची बचत होईल.
ते पुढे म्हणाले,’ एमएनजीएलच्या महापालिकेकडे प्रलंबित ११८ पैकी ८९ परवानग्या मिळाल्या आहेत.उर्वरित परवानग्या लवकरच मिळतील, माझे उद्दिष्ट्य ५ लाखात घरोघरी कनेक्शन देण्याचे होते आतापर्यंत सुमारे ४ लाख ८४ हजार कनेक्शन दिली आहेत.पुढील तीन-चार महिन्यांत पाच लाख कनेक्शनचा टप्पा गाठला जाईल.पावसाळा सुरू होईपर्यंत एमएनजीएलला काम करण्यास परवागनी देण्यात आली आहे.मुळा-मुठा शुद्धीकरण प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम पुढील दोन महिन्यांत सुरू होईल. ड्रॉइंग आणि डिझायनिंगची कामे सुरू आहेत. ११ मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. जायका कडे हि माझे लक्ष आहे.
पाणी या विषयात राजकारण करणे योग्य नाही. महापालिकेचे पदाधिकाऱ्यांची, नगरसेवकांची मुदत संपलेली असली तरी त्यांनी पुणेकरांसाठी काम करणे अपेक्षीत आहे. हा प्रकल्प पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा आहे. त्यामुळे महापालिकेच्या सर्वपक्षीय माजी नगरसेवकांना मी पत्र पाठवले असून, जिथेजिथे या योजनेच्या कामात दिरंगाई होत असेल तिथेतिथे पक्षिय मतभेद विसरून अडथळे दूर करण्यासाठी मदत करा असे आवाहन केले आहे. ते त्यास प्रतिसाद देतील अशी अपेक्षा आहे.
आमदारांना मुंबईत घर तर हवे –
आमदारांना मुंबईत घर देण्याच्या निर्णयाबाबत खासदार बापट यांना विचारले असता, ते म्हणाले, आमदार निवास पाडले आहे, ते कधी पूर्ण होईल माहिती नाही. मुंबईमध्ये लोकप्रतिनिधींना घर आवश्यक आहे. ती घरे त्यांना मोफत व आलिशान नाहीत, तर म्हडामध्ये दिली जाणार आहे. पण या निर्णयाबाबत तुम्ही मुख्यमंत्र्यांनाच विचारा.आमच्या पक्षाचे काय धोरण असेल ते जाहीर होईलच .

