औरंगाबाद, दि. 13 – भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्तने ‘ आजादी का अमृत महोत्सव ‘ या अभियानांतर्गत ‘घरोघरी तिरंगा’ सर्वांच्या मनात तिरंग्याविषयी अभिमान रुजवण्याच्या अभियानात सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी आज येथे केले.
औरंगाबाद येथील सिटी सेंटर, शासकीय कला व ज्ञान विज्ञान महाविद्यालयाशेजारी, किलेअर्क येथील 100 फुट स्मारकध्वज (Monument Flag) चे लोकार्पण डॉ.कराड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामुहिक राष्ट्रगीत झाले. यावेळी मंचावर राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे, खासदार इम्तियाज जलील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार प्रशांत बंब, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता, महानगर पालिका आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, शालेय विद्यार्थी, सामाजिक संस्था यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.
‘आझादी का अमृत महोत्सवा’ निमित्त आर्थिकदृष्ट्या मागास 112 जिल्ह्यात डिजीटल बँक शाखा काढून या जिल्ह्यांना आर्थिक विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी पंतप्रधानांच्या मार्गदर्शनात प्रयत्न करण्यात येत आहे. आर्थिकदृष्ट्या भारताची प्रगती होत असून आर्थिक स्तरावर भारताचा पाचवा क्रमांक लागतो असे सांगून डॉ.कराड म्हणाले की, डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत वाढवण्याचे आव्हान आंतरराष्ट्रीय ट्रेडने स्वीकारले आहे. अंत्योदय योजनेतंर्गत गोरगरीबांच्या आर्थिक सोईकरिता 45 कोटी 50 लाख जनतेचे बँकेत खाते उघडण्यात आले आहे. शहराच्या विकासासाठी शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहचवण्यात येत असून अमृत योजनेच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील निधी देखील केंद्राकडून देण्यात आला असल्याचे यावेळी डॉ.कराड यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्हा नियोजन समिती आणि सीएसआरच्या माध्यमातून सिटी सेंटर तसेच स्मारकध्वजासाठी निधी मिळाल्याचे सांगितले तसेच रत्नागिरीच्या डी.के.फाऊंडेशनच्या राकेश बक्षी यांनी ध्वज उपलब्ध केला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवातंर्गत मोठ्या संख्येने विविध उपक्रम राबविण्यात आले. 9 ऑगस्ट, 2022 रोजी विभागीय क्रीडा संकुल येथे सामुहिक राष्ट्रगीत गायनाचा विक्रम केला आहे. अमृत महोत्सव या उपक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचे उद्दिष्ट असणार आहे. ‘अग्निवीर’ सैन्य भरतीसाठी 86 हजार तरुणांची नाव नोंदणी झाली असल्याचे श्री.चव्हाण म्हणाले.