मुंबई-देवेंद्र फडणवीसांनी विधानसभा अध्यक्षांकडे सादर केलेल्या पेनड्राईव्ह प्रकरणाची संपुर्ण चौकशी सीआयडीमार्फत करणार आहोत. कुणालाही पाठीशी घालणार नाही. अशी स्पष्टोक्ती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज विधिमंडळ अधिवेशनात दिली. पण याव फडणवीसांनी सपशेल नाराजी व्यक्त करीत सीबीआय चौकशीची मागणी केली.
फडणवीसांच्या पेनड्राईव्ह बॉम्बवर उत्तर देताना सभागृहात गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले की, 1993 मध्ये बॉम्बस्फोट झाला आणि गुन्हा 2022 मध्ये दाखल होतो आहे. आता याप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. ज्या पोलिस दलाचा फडणवीसांना अभिमान आहे. त्यावर आता विरोधकांना विश्वास नाही का? असा सवाल वळसे पाटलांनी उपस्थित केला आहे. या निमित्त मला आपल्याला एक सांगायाचं आहे, की आपण एकदा मुख्यमंत्री असताना राज ठाकरे यांना ३३ हजार विहिरींचा जलयुक्त शिवारांचा आपण एक पेनड्राईव्ह दिला होता. मागच्या अधिवेशनात एक ६.५ जीबीचा एक पेनड्राईव्ह दिला. दोन दिवसांपूर्वी आपण एक पेनड्राईव्ह दिला. आज परत आपण पेनड्राईव्ह दिला. म्हणजे आपण काय एखादी डिटेक्टिव्ह एजन्सी काढली की काय? ”असा सवाल यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केला. पेन ड्राईव्हमध्ये फडणवीस यांनी त्यात सगळी माहिती दिली नाही. काही राखून ठेवली आहे. सुशांत सिंग प्रकरण मुंबईत घडून गुन्हा बिहारमध्ये दाखल केला, आणि प्रकरण सीबीआयकडे दिले. असे वळसे पाटील म्हणाले.
तपास तर व्हायलाच हवा
प्रविण चव्हाण यांनी सरकारी वकीलपत्राचा राजीनामा दिला आहे, तो आम्ही स्वीकारला आहे. आम्ही तपास सीआयडीकडे देणार आहोत. प्रकरणामागे नेमके कोण हे तपासावे लागेल, नवाब मलिक पाच वेळा आमदार झाले तेव्हा नवाब मलिक यांना टार्गेट केले जात नाही मात्र केंद्र सरकारच्या विरोधात बोलण्यामुळे मलिकांवर कारवाई झाली. असे म्हणत वळसे पाटील यांनी भाजपवर टीका केली.

