भारतीय संस्कृतीत आणि परंपरेत श्री गणेशाला फार मोठे स्थान आहे. गणांचा नायक असलेल्या गणेशाला पूजेमध्ये नेहमीच अग्रस्थान असते. गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवरच येऊ घातला आहे. गणेश चतुर्थीच्या या पार्श्वभूमीवर गायिका कविता पौडवाल यांनी गणेश स्तुतीचा चिंतामणी हा सोलो अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. अर्थपूर्ण स्वररचना, सुरेल संगीत आणि उत्तम स्वरसाज असा सुयोग जुळून येत एका सुमधुर गीताची भेट रसिकांना मिळणार आहे. एका छोटेखानी सोहळ्यात हा अल्बम नुकताच प्रकाशित करण्यात आला. बाप्पाच्या इच्छेमुळेच चिंतामणी अल्बम साकारला गेल्याची भावना कविता पौडवाल यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या.
‘हे गणनायका शुभदायका वसशी मनी चिंतामणी’ असे या गीताचे बोल असून किशोर मोहिते यांनी ते लिहिलं असून त्यांचाच संगीतसाज या गाण्याला लाभला आहे. या गीताचं दिग्दर्शन गौतमी बेर्डे यांनी केलं आहे. कोणत्याही कामाची सुरुवात आपण गणेशाचे वंदन करुनच करतो. गणपती बाप्पाचा उत्सव हा आनंद व आशेचं प्रतीक आहे. या दिवसात प्रत्येकामध्ये एक उत्साह पहायला मिळतो. हाच उत्साह या गीतामधून आपल्याला दिसणार आहे. कलेची आराधना ही गणपतीची आराधना केल्यासारखी असते असं मानणाऱ्या कविता पौडवाल यांची चिंतामणी ही सांगीतिक अर्चना श्रीगणेशाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे.