“आम्ही सुद्धा पंतप्रधानांचे नाव घेतो”; परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
मुंबई -पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आलेल्या सहायक पोलिस उपनिरीक्षक सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्यावर दबाव टाकला होता. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेवरूनच वाझेला पुन्हा सेवेत घेण्यात आले होते, असा दावा मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) दिलेल्या जबाबात केला आहे. पोलीस बदल्यांच्या याद्या अनिल देशमुख यांच्यासह मंत्री अनिल परब यांच्याकडून अंतिम होऊन यायच्या असाही आरोप केला आहे . यावर सेनेचे खासदार संजय राउत यांनी प्रतिक्रीया दिली आहे , ते म्हणाले ,’ आम्हीसुद्धा पीएम चे नाव घेतो-“परमबीर सिंह हे आरोपी आहेत. त्यांच्या वर खंडणीपासून अपहरणापर्यंत असे अनेक गुन्हे आहेत. मनसूख हिरेन प्रकरणात त्यांच्यावर कोणते आरोप लावले आहेत ते मला माहिती नाही. आरोपी आपल्या बचावासाठी अशी नावे घेत असतील. या आरोपांचे विरोधीपक्षाने भांडवल केले तरी याचा काही उपयोग नाही. आम्ही सुद्धा पंतप्रधानांचे नाव घेतो. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचेही नाव घेतले जात होते. कोण कोणाचे नाव घेतो याच्यावरुन काही बोध होत नाही,” असे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटी वसुली प्रकरणी ईडीने जानेवारी महिन्यात पुरवणी आरोपपत्र दाखल केलेले आहे. त्यामध्ये परमबीरसिंग यांनी हा दावा केलेला आहे. वाझेला पुन्हा पोलिस सेवेत सामावून घेण्यासाठी आपल्यावर थेट तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचा थेट दबाव होता. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडूनही सूचना करण्यात आल्या होत्या,’ असे परमबीर यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे.
तुरुंगात वाझेचा छळ होतोय-असाही परमबीर चा दावा
वाझेचा तुरुंगात छळ केला जात आहे. त्याचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी दररोज शिव्याशाप, अंगझडती घेतली जाते. ठाणे येथील एका पोलिस उपायुक्त वाझेला भेटण्यासाठी तुरुंगात गेला होता. त्यानेही त्याच्यावर दबाव टाकला, असाही दावा परमबीर यांनी केला आहे.
जबाब बदलण्यासाठी वाझेवर देशमुखांचा दबाव
वाझेने सक्तवसुली संचालनालयासमोर दिलेला जबाब मागे घ्यावा यासाठी अनिल देशमुख यांनी दबाव आणला, असाही आरोप परमबीर यांनी केला आहे. निवृत्त न्यायमूर्ती के.यू. चांदीवाल यांच्या एकसदस्यीय आयोगासमोरील सुनावणीवेळी ३० नोव्हेंबर २०२१ रोजी देशमुख आणि वाझे यांची भेट झाली होती. त्या वेळी वाझेवर जबाब मागे घेण्यासाठी देशमुख यांनी दडपण आणले, असे परमबीर यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
परमबीर हेच अँटिलिया स्फोटके-हिरेन हत्येचे मास्टरमाइंड : अनिल देशमुख
दरम्यान परमबीरसिंग हेच मुकेश अंबानी यांचे निवास अँटिलियासमोरील स्फोटके आणि ठाण्याचा व्यावसायिक मनसुख हिरेनच्या हत्येचे मास्टरमाइंड असल्याचा जबाब माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडीकडे दिला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीच्या पुरवणी आरोपपत्रातील जबाबात त्यांनी हा दावा केला आहे. माजी पोलिस अधिकारी सचिन वाझेला आपण ओळखत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
“बदल्यांची यादी देशमुखांना अनिल परब देत होते, पण परबांना यादी कोण देत होतं?”

