मुंबई- एकीकडे मोठे-मोठे नेते आणि दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघेंचा सैनिक असलेल्या माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर भाजपने विश्वास ठेवला. मी कुणावरही जोरजबरदस्ती केली नाही. भाजपने मनाचा मनाचा मोठेपणा दाखवून मला मुख्यमंत्री केले अशा शब्दात नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप आणि फडणवीसांवर स्तूतीसुमने उधळली.देवेंद्र फडणवीस ११५ लोक होते आणि माझ्याकडे ५० लोक असताना त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून मला मुख्यमंत्री पद दिले. त्याबद्दल मी .पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांचे आभार मानतो .
विधानसभा अध्यक्षांची आज निवडणूक झाली. यात शिंदे-भाजपचे राहूल नार्वेकर यांनी विजय मिळवला. त्यांच्याविषयी अभिनंदनपर भाषण शिंदे यांनी केले त्यावेळी त्यांनी आपली बाजू स्वच्छ असल्याचे दाखवण्याचा प्रयत्नही केला.
विधानसभा अध्यक्षांची परंपरा गौरवशाली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या विधानसभा अध्यक्षांचे अभिनंदन केले. विधानसभा अध्यक्षांची परंपरा गौरवशाली आहे. लोकशाहीचा स्तंभ हा भारतीय संविधानाची प्रथा परंपरा, तसेच सार्वभौमत्वाने चालते. आम्ही सत्ताधारी असलो तरीही आमच्यावर पारदर्शकपणे जबाबदारीने राज्याचा कारभार चालवायचा आहे असे ते म्हणाले.
या पदाची प्रतिष्ठा जपली
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आतापर्यंत या पदाची प्रतिष्ठा जपली गेली आता यापुढेही प्रतिष्ठा जपायला हवी असे शिंदे यांनी सांगीतले. सत्ताधाऱ्यांना झुकते माप देतील अशी अपेक्षा नसून त्यांनी सर्वांशी निपक्ष राहतील अशी विधानसभा अध्यक्षाप्रती त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.
नार्वेकर सर्वात तरुण अध्यक्ष
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, नार्वेकर विधानसभेचे सर्वात तरुण अध्यक्ष आहेत असे सांगतानाच सभागृहातील कोणत्याही सदस्यावर अन्याय होणार नाही. त्यांच्या मतदारसंघातील सदस्याला वेळ द्यावा, सभागृहातील चुकीच्या प्रकारावरही आपण कार्यवाही करावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
जगातील एकमेव उदाहरण
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शिवसेना भाजपची सत्ता स्थापन झाली. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने हे सरकार स्थापन झाले. आतापर्यंतच्या ज्या घटना घडल्या त्या विरोधकांनी सत्तेत जाण्यासाठी घडल्या पण आज जी घटना घडली त्यात विरोधकांत सत्ताधारी सामील झाली हे जगातील एकमेव उदाहरण आहे असे ते म्हणाले.
भाजपने माझा सन्मान केला
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, लोकशाही आणि वैचारीक भूमिकेला पाठींबा दिला असून सर्वांच्या डोळ्यात अंजण घालणारा निर्णय आम्ही आणि मी घेतला. भाजपने मोठेपण दाखवत माझा सन्मान केला असेही ते म्हणाले.

